लोकसत्ता वार्ताहर

पालघर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पालघर विभागात पाच नव्या एसटी बस दाखल झाल्या आहेत. यापैकी एक बस स्वारगेट, दोन पैठण व दोन भुसावळसाठी सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांचा प्रवास आनंददायी होणार आहे.

पालघर आगारात नवीन बस सेवेचा लोकार्पण कार्यक्रम मंगळवारी पालघर बस स्थानकात विभाग नियंत्रक कैलास पाटील यांच्या हस्ते पार पडला. १४ वर्षांवरील आयुर्मान झालेल्या जवळपास १२ गाड्या सप्टेंबर महिन्यात कालबाह्य होणार आहेत. त्या दृष्टीने लांब व स्थानिक फेºयांसाठी बसची अधिक मागणी करण्यात आली होती.

पालघर आगारात लांब व स्थानिक पल्ल्याच्या ६८ बस गाड्या कार्यरत असून त्यापैकी २६ गाड्या या लांब तर उर्वरित केळवे, माहीम, सातपाटी, मनोर, खारेकुरण, बोईसर व इतर स्थानिक फेऱ्यांसाठी वापरल्या जातात.

राज्य परिवहन महामंडळाच्या बसने अधिक सुरक्षित, आरामदायक आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा अनुभव घेण्याचे आवाहन राज्य महामंडळाकडून करण्यात येत असते. नागरिकांच्या सोयीसाठी पालघर आगाराकरिता ३० गाड्यांची मागणी केली असून उर्वरित गाड्या लवकरच दाखल होणे अपेक्षित आहे. -कैलास पाटील, विभाग नियंत्रक, पालघर

सर्व आगारांमध्ये नवीन बसची आवश्यकता

बसने प्रवास करणाºया नागरिकांची वाढती संख्या व बसची झालेली दुरवस्था पाहता जिल्ह्यातील आठ आगारांमध्ये नवीन बस गाड्यांची आवश्यकता आहे. लांब पल्ल्याच्या जुन्या गाड्यांमध्ये बिघाड झाल्यावर प्रवाशांना तासनतास ताटकळत बसावे लागते. यावर प्रशासनाने लवकरच उपाययोजना करून सर्व आगारांमध्ये नवीन बस दाखल करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.