नीरज राऊत
पालघर : जव्हार शहरालगत असणाऱ्या जांभूळविहीर परिसरात रोजगार हमी योजनेतून झालेल्या फरसबंदी (पेवर ब्लॉक) बसवण्याच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सुमारे २० लक्ष रुपयांची निविदा पुन्हा प्रसिद्ध केली आहे. झालेल्या कामांचा दुबार मोबदला लाटण्याचा जव्हारमधील आणखी प्रकार उघडकीस आला आहे.
जांभूळविहीर ते साई मंदिर हा सुमारे २०० मीटरचा रस्ता असून त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने १६.३७ लक्ष रुपयाची निविदा रक्कम असणारी निविदा २७ जून रोजी प्रसिद्ध केली आहे. या निविदेसाठी ४ जुलै (आज) पर्यंत अर्ज करण्याची मुभा होती. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षांतील या कामाला सुमारे २० लाख रुपयापर्यंतची तांत्रिक मान्यता २ मे २०२३ रोजी प्राप्त झाली होती.
या कामामध्ये फरसबंदी बसवण्यासाठी पाया खोदाई करणे, रबल सोलिंग करणे, पीसीसी करणे, ६० मिलिमीटर जाडीचे फरसबंदी बसवणे, माहिती फलक बसवणे व इतर अनुषंगिक बाबी समाविष्ट केल्या आहेत. मात्र, रायतळे ग्रामपंचायतीने याच परिसरात सुमारे १७० मीटर लांबीचे काम १० लाख रुपये खर्च करून पूर्ण केले असल्याचे दिसून आले आहे.
जांभूळविहीर येथे नेमके कोणत्या ठिकाणापासून कोणत्या ठिकाणापर्यंत फरसबंदी बसवायची आहे याचा तपशीलवार उल्लेख न करता मोघम उल्लेख करून निविदा काढण्यात आली आहे. अशाप्रकारे झालेल्या कामाचा मोबदला दुबार लाटण्याचा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभाग व निविदा भरणाऱ्या ठेकेदारांकडून केला जाण्याची शक्यता उघडकीस आली आहे. जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये यापूर्वी अशा अनेक कामांना चेन लिंकेज (किलोमीटर निहाय तपशील) न देता वेगवेगळी नावे देऊन दुबार मोबदला लाटण्याचे प्रकार घडल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणात चौकशी झाली असून अहवाल उच्च स्तरावर कारवाईच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगण्यात येते.
या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन पाटील यांच्याशी संपर्क साधला असता या कामाला तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर रोजगार हमी मधून काम झाल्याचे निदर्शनास आले. उर्वरित रस्त्याचे ज्या प्रमाणात काम होईल त्याच प्रमाणात देयके अदा करण्यात येतील असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र जूनमध्ये निविदा प्रसिद्ध करताना सुधारित नावासह किंवा विशिष्ट ठिकाणाचा उल्लेख करून निविदा प्रसिद्ध करण्याऐवजी मोघम स्वरूपात कामाची निविदा का प्रसिद्ध केली याबद्दल ते योग्य उत्तर देऊ शकले नाहीत.