पालघर: नीरज राऊत
राष्ट्रीय महामार्गावर काँक्रीटीकरणाचे काम सुरू असून या कामाच्या व्याप्तीमुळे महामार्गावर तुफान वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. काँक्रिटीकरणाचे अधिकतर काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याने पालघर जिल्ह्यातील रहिवाशांसाठी महामार्गावरील पुढील सहा महिन्याचा प्रवास वाहतूक खडतर ठरणार आहे.
राष्ट्रीय महामार्गावर दहिसर ते आच्छड या १२१ किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये पावसाळ्यात अनेकदा खड्डे पडून वाहतुकीवर परिणाम होत असे. या भागात पडणारा मुसळधार पाऊस महामार्गाच्या रस्त्यावर साचणारे पावसाचे पाणी तसेच पाण्याचा निचरा होण्याच्या मार्गात झालेल्या अतिक्रमणामुळे पावसाळ्यात महामार्गाची दयनीय अवस्था होऊन अपघात होत असत. यावर तोडगा म्हणून राष्ट्रीय महामार्गाने राज्यातील संपूर्ण भागात काँक्रीटीकरणाचा प्रकल्प हाती घेतला आहे.
महामार्गाच्या या कामासाठी नेमलेल्या ठेकेदाराकडे दररोज ३०० ते ४०० मीटर रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याची क्षमता असून काँक्रीट केलेल्या रस्त्यावर किमान १५ ते २० दिवस पाणी अच्छादन ठेवणे (क्युरिंग) आवश्यक आहे. त्यामुळे महामार्गावरील तीन मार्गीकांच्या दुतर्फा कॉंक्रिटीकरण करण्यासाठी ७२० किलोमीटर लांबीच्या मार्गीकेचे काँक्रिटीकरण १४ ते १५ महिन्यात पूर्ण करणे आव्हानात्मक ठरणार आहे.
हेही वाचा >>> पालघर: वाढवण बंदर जन सुनावणीचा सोपस्कार पूर्ण
मार्गीकेच्या काँक्रिटीकरण करण्याच्या वेळी एका पट्ट्यातील फक्त एकच मार्गिका एका वेळी कॉंक्रीट करावी असे जिल्हा प्रशासनाने प्रथमता ठरवले होते. मात्र असे केल्यास अपेक्षित कालावधीत काम पूर्ण होणे शक्य नसल्याचे दिसून आले. त्यामुळे वाहतूक रहदारी खूप नसलेल्या ठिकाणी अर्थात वसई विरारच्या पलीकडे एकावेळी दोन मार्गिकांचे काँक्रिटीकरण हाती घेण्यात आली आहे.
जड व अवजड वाहनांना मुंबई ठाण्यामध्ये प्रवेश घेण्याबाबत निर्बंध आहेत. अशा परिस्थितीत अवजड वाहनांची वाहतूक सुरू झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावर काँक्रिटीकरण काम सुरू असलेल्या ठिकाणी व त्या पट्ट्याच्या अलीकडे वाहनांच्या एक ते चार किलोमीटर पर्यंत रांग लागतानाचे पुन्हा चित्र दिसून येत आहे. या कोंडीमध्ये लहान वाहनांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून कोंडी मधून वाट काढण्यासाठी एक ते दोन तासांचा अवधी देखील लागत आहे. रस्त्याकडेला जागेची उपलब्धता नसल्याने तसेच अस्तित्वात असलेले सर्विस रोड व पुलाच्या बाजूला रस्त्यांची कामे अपूर्ण असल्याने तसेच अवस्था बिकट असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
काँक्रिटीकरण हाती घेताना त्या ठिकाणी वाहतूक पोलिसांसह ट्रॅफिक वॉर्डनची नेमणूक करणे अपेक्षित असून त्यावर देखरेख ठेवण्यासाठी यंत्रणा पुरेशा प्रमाणात कार्यान्वित करावी असेही सुचवण्यात आले होते. त्याचबरोबर वाहतूक कोंडीच्या परिस्थितीत वाहनांनी विरुद्ध दिशेच्या मार्गीकेचा वापर टाळण्यासाठी दुभाजकांमध्ये असणाऱ्या मोकळ्या जागा (मिडियन कट) बंद करणे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याचे देखील जिल्हा प्रशासनाने सुचित करण्यात आले होते. या सर्व आखलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने महामार्गावरील वाहतूक अनेक ठिकाणी ठप्प होताना दिसून येते.
काँक्रिटीकरणाच्या कामाची व्याप्ती व कमी अवधीत काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे कारण पुढे करून सध्या काम सुरू असल्याने त्यावर पर्यायी उपाय योजना उपलब्ध नसल्याने राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी होऊन एकाच ठिकाणी तासनतास वाहन खोळंबल्याचे प्रकार पुन्हा घडू लागले आहे.
दहिसर ते वसई, वसई ते खानिवडे टोल नाका, खानिवडे टोल नाका ते चारोटी तसेच चारोटी ते अच्छाड अशा चार टप्प्यांमध्ये काम हाती घेण्यात येणार असून सद्यस्थितीत काँक्रिटीकरण करणारे चार यंत्र कार्यरत आहेत. काँक्रिटीकरण यंत्रांची संख्या २६ जानेवारी नंतर सहावर वाढवण्यात येणार असून त्यामुळे एकाच वेळी अधिक प्रमाणात अधिक ठिकाणी काँक्रिटीकरण करण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. अवजड वाहतूक तसेच शिस्त न पाळणाऱ्या वाहन चालकांमुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर होण्याविरुद्ध कारवाई करणे गरजेचे झाले आहे. मनोर, वाडा, भिवंडी रस्त्याची अवस्था बिकट असल्याने अवजड वाहनांना त्या मार्गे पाठवणे देखील शक्य असल्याचे दिसून येत नाही. पालघर जिल्ह्यातून मुंबईकडे तसेच मुंबई कडून बाहेर पडणाऱ्या वाहनांची संख्या २५ ते ३० हजार प्रतिदिन इतकी असून यामुळे महामार्गाचा वापर पुढील सहा महिन्यांसाठी त्रासदायक ठरणार आहे