पालघर: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी परिसरामध्ये उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्यासह त्यांच्यासोबत वाहनात असलेल्या एकाचे अपघाती निधन झाल्यानंतर महामार्ग प्राधिकरण खडबडून जागे झाले आहे. अपघाताच्या आठ दिवसांनंतर अपघातग्रस्त भागांमध्ये ‘सावकाश जा’ असा सूचनाफलक दर्शनी भागात लावला आहे. मात्र अपघाताला कारणीभूत येथील अनेक त्रुटी आजही कायम आहेत.
अलीकडेच जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी रस्ते सुरक्षा समितीच्या बोलाविलेल्या तातडीच्या बैठकीत महामार्गावरील त्रुटी व समस्या याबाबतीत प्राधिकरणाच्या उच्च अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली होती. त्यानंतर अपघातग्रस्त भागामध्ये दुभाजकावर दर्शनी भागात हे फलक लावले आहेत. चारोटी सूर्या नदी पुलावर तीन पदरीपासून दोन पदरी रस्ता होणाऱ्या दीडशे मीटर आधी हा सूचनाफलक बसवण्यात आला आहे याच भागात सायरस मिस्त्री यांचा अपघात झाला होता.
अपघात स्थळापासून दीडशे मीटर आधी हा सूचनाफलक लावला असला तरी महामार्गावर अनेक धोकादायक ठिकाणांवर सूचनाफलक अस्तित्वात नाहीत. महामार्गावरील अनेक त्रुटी आजही कायम आहेत. महामार्गावरील खड्डे एका मर्यादित वेळेत बुजविण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दोन-चार दिवसांपूर्वी दिले असले तरी अजूनही काम हवे तसे सुरू झालेले नाही.
अनेक ठिकाणी अनधिकृत वळणे, अनधिकृत कट, सेवारस्ते वळणे योग्य नसणे, महामार्गावर तांत्रिक वळण दोष, संपर्क यंत्रणा जर्जर, टोल नाक्यांवर सुविधा नसणे, महामार्गावर गस्ती नसणे अशा अनेकविध सुविधांचा अभाव आहे. मिस्त्री यांच्या मृत्यूनंतर महामार्गावर तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजनांचा आराखडा काय असेल हेही समजू शकलेले नाही. त्यामुळे प्राधिकरणाने जिल्हाधिकारी यांना रस्ते सुरक्षा समितीत दिलेले उत्तर हवेतच विरल्याचे दिसत आहे. टोल कर भरणाऱ्या प्रत्येक करदात्याला महामार्गावर आवश्यक ती सुविधा मिळाली पाहिजे असे नियम म्हणतो. मात्र महामार्गावर सुविधेपेक्षा मरण स्वस्त झाले आहे, हे अपघाती मृत्यूच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. मिस्त्री यांच्या अपघातानंतर आठवडय़ाभरात दहा ते वीस गंभीर अपघात घडलेत. त्यात काहींना आपला जीव गमवावा लागला, तर काही गंभीर रुग्णालयात उपचारार्थ दाखल आहेत. या स्थितीनंतरही भरुच गुजरात येथे कार्यालयात बसलेल्या महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे डोळे उघडलेले नाहीत, त्यामुळे या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा व लवकरात लवकर महामार्गाच्या त्रुटी दूर करा, अशी मागणी होत आहे.
एकच सूचना फलक
चारोटी परिसरातील सूर्यानदी पुलावर तीन पदरीपासून दोन पदरी रस्ता होताना ज्या ठिकाणी सायरस मिस्त्री यांचा अपघात झाला त्याच्या दीडशे मीटर आधी ‘दुभाजकावर सावकाश जा’ असा एकच सूचनाफलक व चौकोनी रिफ्लेक्टर लावण्यात आले आहे. इतर ठिकाणी समस्या कायम आहेत. त्यावर अजूनही उपाययोजना केल्याची दिसत नाही.