डहाणू, नरपड समुद्रातील जीवसृष्टी संकटात; दुर्गंधी पसरत असल्याच्या तक्रारी

डहाणू: समुद्रातून वाहून आलेल्या डांबरगोळ्या, प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे डहाणू सागरी किनारा तसेच नरपड किनाऱ्यावर दुर्गंधी पसरली आहे. प्लास्टिकचा खच आणि तेल गोळ्यांनी समुद्राचे मोठय़ा प्रमाणावर प्रदूषण होत आहे. यामुळे समुद्रातील जीवसृष्टीला धोका निर्माण झाला आहे. प्रदूषणामुळे मासे मिळण्याचे प्रमाणही गेल्या काही वर्षांत कमी झाले आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. याबाबत नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना विचारले असता हा पावसाळी कचरा असून नगर परिषद वेळोवेळी कचरा दूर करत असल्याचे सांगितले.

डहाणू समुद्रकिनाऱ्यावर काही दिवसांपूर्वी तेल तवंगामुळे बनलेले हे गोळे वाहून आले आहेत. प्लास्टिक कचऱ्यानुळे समुद्र किनारपट्टीवरील पर्यावरण धोक्यात आले आहे. येत्या काही दिवसात समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी मुभा मिळणार आहे. यामुळे देशी-विदेशी पर्यटक या किनाऱ्यांवर येत असतात. परंतु मूलभूत सुविधांचीही वानवा आहे. संबंधित प्रशासनाने येथे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

पालघर जिल्ह्य़ात वसई, पालघर, डहाणू तालुक्याला किनारपट्टीने वेढले आहे. वसई, कळंब, अर्नाळा, नािरगी, दातिवरे, कोरे, एडवण, केळवे, माहीम, वडराई, शिरगाव, सातपाटी, शिरगाव, दांडी, उच्छेळी, तारापूर, चिंचणी, वाढवण, गुंगवाडा, डहाणू खाडी, डहाणू चौपाटी, आगर, नरपड, चिखला, बोर्डी, झाई  हे समुद्र किनारे या भागाला लाभलेले आहेत. समुद्रातून वाहून तेल गोळ्या, प्लास्टिकचा कचरा या किनाऱ्यांवर येत आहे. याचा पर्यावरणावर देखील परिणाम होत आहे. यामुळे जीवसृष्टीला धोका निर्माण झाला आहे.

झिंगे, खेकडे, शिंपल्यांना धोका समुद्रातील तेल तवंगामुळे सागरी जीवांवर दुष्परिणाम होत आहे. सूक्ष्म झिंगे, खेकडे, शिंपल्या आदी प्रजातींना धोका निर्माण होतो. प्रवाळांचे नुकसान होते. जे कधीही भरून निघत नाही. शिवाय दूषित झालेले मासे मानव खात असल्यास शरीरास अपाय पोहचून जीवघेणे आजार उत्पन्न होतात. सागर प्रदूषणामुळे अन्नसाखळीत अडथळा निर्माण होतो. परिणामी सागरी पर्यावरण बिघडते आहे.

डहाणूची किनारपट्टी प्लास्टिकमुक्त होणे गरजेचे आहे. प्लास्टिकमुळे पर्यावरणाला म्हणजेच सागरी जीवांना धोका पोहोचतो.

– हरेश्वर मरदे, मच्छीमार नेते