लोकसत्ता वार्ताहर
कासा : आजपासून चारोटी जवळील प्रसिद्ध महालक्ष्मी मातेची यात्रा सुरू होत आहे. या यात्रेसाठी पालघर जिल्ह्यातील भक्तांसोबतच गुजरात, नाशिक या ठिकाणावरून ही मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करतात. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वनसंपत्ती उपलब्ध आहे. या दिवसात करवंद, काजू, जांभूळ, कच्चे गावरान आंबे, गावठी बोरे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात.
आदिवासी महिला हा रानमेवा गोळा करून राष्ट्रीय महामार्ग, डहाणू नाशिक राज्यमार्ग यांच्या बाजूला आपली छोटी छोटी दुकाने लावली आहेत. शहरी भागातील नागरिकांना या रान मेव्याचे आकर्षण असल्याने नागरिक आवडीने खरेदी करतात. तसेच मोगऱ्याच्या कळ्या (फुले) त्यामुळे या महिलांनाही रोजगार उपलब्ध होत आहे.
रानमेवा,भाजीपाला,रान कंद आणि फळे विक्रीतून ग्रामीण भागातील आदिवासी महिलांनी स्वयंरोजगाराच्या संधी शोधत सक्षम बनण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यांच्या या प्रयत्नांना यात्रेनिमित्त ग्राहकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने या महिलांना स्वयं रोजगाराची दिशा सापडली आहे.
पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कुटुंबे उदरनिर्वाहासाठी पावसाळ्यातील शेतीवर अवलंबून असतात. मात्र पावसाळा संपल्यानंतर उत्पन्नाचे कायम साधन उपलब्ध नसल्यामुळे डहाणू जव्हार मोखाडा विक्रमगड या आदिवासी भागातील कुटुंबांना रोजगारासाठी शहरी भागात स्थलांतर करण्याची वेळ येते. काही कुटुंबे मात्र स्थलांतर न करता आपल्या गावाजवळच रोजगाराचे विविध पर्याय शोधण्याचा प्रयत्न करतात. कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी आर्थिक हातभार लागावा यासाठी पुरुषांसोबतच महिलांनी देखील पुढाकार घ्यायला सुरुवात केली आहे.
जंगलातून निघणारी खाण्यालायक कंदमुळे, परसबागेत उत्पादित केलेला भाजीपाला व काही प्रमाणात फळे खरेदी करून विक्रीसाठी वैविध्यता आणत आठवडे बाजार आणि महामार्गाशेजारी विक्रीचा व्यवसाय ग्रामीण महिलांनी सुरू केला. या विक्रीतून एक महिला दिवसाकाठी पाचशे ते एक हजार रुपयां पर्यंत उलाढाल करते.
पहाटे घरातील कामे आटोपून कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी या महिला रानमेवा विक्री करण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. उड्डाणपुल, राज्यमहामार्ग, महामार्ग, जोडरस्ते आदी ठिकाणी त्या ही विक्री करीत असल्याने व शेतमाल ताजा व स्वस्त असल्याने ग्राहक सहज खरेदी करीत आहेत.
रानमेवा आणि सेंद्रीय भाजीपाला
यात्रा सुरू झाल्याने आंबट गोड करवंदे व बोरे, जांभळे, तोरण, चुलीवर उकडलेल्या तुरीच्या शेंगा व गोळे, वाल-पापडीच्या शेंगा व गोळे,रताळी,रात्याचे लाल व मेढय़ाचे सफेद कोनफळ,कचरा कंद, अळू पाने, भादूरल्या, चवळी शेंगा, हिरवा हरभरा, कोवळा टाकळा, कारल्या शेवगा शेंगा, बांबूचे शिंब (वासता), उकडलेले माडाचे तरले, मेथी, पालक, कोथिंबीर,पातीचे ओले कांदे,गावठी आंबट टोमॅटो, दुधी,तिखट पाणीदार मुळा, गावठी हिरवी सालीचे लिंबू असा सेंद्रिय भाजीपाला तर पपई, चिकू, पेरू, गावठी व अमदाबाजी बोर, सफेद जांभूळ अशी फळे ग्राहकांना आकर्षित करीत असल्याने मुंबई अहमदाबाद महामार्ग, चिल्हार फाटा उड्डाणपुल,मस्तान नाका उड्डाणपुल, टेन नाका उड्डाणपुल,विक्रमगड रस्ता, मनोर पालघर महामार्ग आदी महामार्गालगत ग्राहक वाहन थांबवून त्यांना हा रानमेवा व सेंद्रिय भाजीपाला खरेदी करण्याचा मोह आवरता येत नाही.