बोईसर : सरकारी यंत्रणांना अंधारात ठेवून पालघर तालुक्यातील सफाळे रेल्वे स्थानकानजीक नवघर गावाजवळ मुरूम आणि माती उत्खनन सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. फक्त आठ हजार ब्रास मुरूम उत्खननाची परवानगी असताना आजवर दीड लाख ब्रासचे उत्खनन केल्याने ग्रामस्थांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. या प्रकाराची तक्रार ग्रामस्थांनी मंडल अधिकाऱ्यांकडे केली होती, परंतु उत्खनन पाहणी अहवाल अद्याप तहसीलदारांकडे पाठविण्यात आला नसल्याचा आरोप तक्रारदार ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थांचे म्हणणे
ठेकेदार कंपनी अनधिकृत उत्खनन करीत आहे. जितक्या जमिनीवर उत्खनन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यापेक्षा अधिक उत्खनन करण्यात आले आहे. त्यामुळे गौणखनिज जागेचे मोजणी करावी. त्यानुसार कंपनीवर दंड आकारावा, असे ग्रामस्थांनी मागणीत म्हटले आहे. संदीप किमी, बराहुल सापने आणि ऋतिक पाटील या प्रकरणातील मुख्य तक्रारदार आहेत.
* सफाळे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील नवघर गावाजवळ आठ हजार ब्रास मुरूम उत्खननाची परवानगी. मात्र, आजवर दीड लाख ब्रासचे उत्खनन.
* जागेची शासकीय मोजणी नाही. हद्दनिश्चिती न झाल्याने परवानगी नसलेल्या जागेमधूनही मुरूम उत्खनन
* उत्खनन परवान्याची मुदत संपल्यानंतरही उत्खनन आणि वाहतूक
* परिणामी शासनाला लाखो रुपये महसुलाचे नुकसान
पुरावे असे
‘जी आर इन्फ्रा प्रोजेक्ट’ने गट क्रमांक १८८ मध्ये घेतलेला माती उत्खनन आणि वाहतूक परवान्याची मुदत ६ नोव्हेंबर रोजी संपली आहे. तरीही १४ नोव्हेंबर पर्यंत उत्खनन आणि वाहतूक सुरू होती. महसूल विभागाचे कर्मचारी उत्खनन स्थळी येणार असल्याची आगाऊ माहिती मिळाली. त्यानंतर कंपनीने उत्खनन बंद केले होते. काही हजार ब्रास माती उत्खननाचा परवाना असताना दीड लाख ब्रास उत्खनन केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. १५ नोव्हेंबर रोजी स्थळ पाहणी अहवाल तहसीलदार कार्यालयात पाठवण्यात आलेला नाही. अनधिकृत उत्खननावर कारवाईबाबत मंडळ अधिकारी चालढकल का करीत आहेत, असा सवाल तक्रारदार संदीप पाटील यांनी केला आहे.
माहितीत तफावत असल्याचा आरोप
नवघर गावातील गट क्रमांक १८८ मध्ये बेकायदा माती उत्खनन सुरू असल्याची तक्रार सफाळे मंडळ अधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. त्यानंतर १५ नोव्हेंबर २०२२ रोजी अधिकारी तेजल पाटील आणि करवाळे सजाचे तलाठी किरण जोगदंड यांनी प्रत्यक्ष उत्खनन जागेची पाहणी केली. उत्खननासाठी दिलेली परवानगी आणि प्रत्यक्षातील उत्खनन यांत तफावत आढळल्याचा आरोप तक्रारदार ग्रामस्थांनी केला.
उत्खनन पाहणी अहवाल तहसीलदारांकडे पाठवण्यात येईल. त्यांच्या आदेशानुसार मोजमाप घेण्यात येईल. -तेजल पाटील, मंडळ अधिकारी, सफाळे
परवानगी घेण्यात आली आहे. २० हजार ब्रास माती उत्खननाच्या परवानगीच्या प्रती मंडळ अधिकाऱ्यांना दाखवण्यात आल्या आहेत. – विनय जैन, प्रतिनिधी, जीआर इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनी