विनायक पवार, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बोईसर : पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक वसाहतीमुळे बोईसर परिसरातील नागरीकरण झपाटय़ाने वाढत आहे.  बोईसर व लगतच्या ग्रामपंचायतींची संयुक्त नगर परिषद व्हावी याकरिता मागील अनेक वर्षांपासून नागरिक प्रतीक्षेत आहेत. मात्र सरकार, राजकीय नेत्यांकडून आश्वासनांशिवाय काहीच मिळत नसल्यामुळे सर्व ग्रामपंचायतींवर नागरी सुविधा पुरविताना प्रचंड ताण पडत आहे.

देशातील पहिला अणू ऊर्जा प्रकल्प, भाभा एटोमिक रिसर्च सेंटर आणि आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत तारापूर येथे स्थापन झाल्यानंतर बोईसर परिसराच्या भरभराटीस प्रारंभ झाला. या आस्थापनेमध्ये काम करणारे अधिकारी, कामगार वर्ग व सेवा क्षेत्रात उभी राहिलेले आस्थापनांमधील कर्मचारी बहुतांश बाहेरील असल्याने त्यांच्या निवासासाठी गेल्या ४० वर्षांत बोईसर व लगतच्या दांडीपाडा, सरावली, खैरापाडा, पास्थळ, बेटेगाव, मान, कोलवडे, कुंभवली, सालवड, पाम, टेंभी या ग्रामपंचायत क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात गृहनिर्माण प्रकल्प आणि झोपडपट्टया उभ्या राहिल्या आहेत.

संपूर्ण परिसराची लोकसंख्या तीन लाखांपेक्षा अधिक झाली आहे. या मोठय़ा लोकसंख्येला रस्ते, पाणी, घनकचरा, सांडपाणी निचरा व्यवस्था, वाहनतळ, उद्याने आणि पथदिवेसारख्या आवश्यक नागरी सुविधा पुरविताना ग्रामपंचायत प्रशासनाच्या नाकीनऊ येत आहे. अपुरा निधी आणि अत्यल्प कर्मचारी यामुळे दिवसेंदिवस या समस्या उग्र बनत चालल्या आहेत. बोईसर आणि परिसरातील आठ ग्रामपंचायतींचे नगर परिषदेत रूपांतर करावे यासाठी आतापर्यंत राज्य सरकार आणि विविध राजकीय पक्ष आणि नेत्यांनी अनेकदा फक्त कोरडी आश्वासने दिली आहेत. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी साठ हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या  ग्रामपंचायतीनी  मागणी केल्यास तेथे नगर परिषद किंवा नगरपालिकेला मान्यता दिली जाईल अशी घोषणा केली आहे.  मोठय़ा ग्रामपंचायतींनी नगर परिषदेत रूपांतर करण्यासाठी सरकारला प्रस्ताव पाठविणे आवश्यक आहे. नगर परिषदेत रूपांतर झाल्यास त्या ठिकाणी अमृत- २ ही योजना राबविणे सहज शक्य होईल. त्याचप्रमाणे राज्य सरकारकडून नागरी सुविधा राबविण्यासाठी मोठय़ा प्रमाणात निधी देणे शक्य असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. त्यामुळे लाखो बोईसरकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.   संबंधित यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी यांनी तातडीने याबाबत पाठपुरावा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

दाटीवाटीच्या वस्ती

अवधनगर, भय्या पाडा, धोंडीपूजा, धनांनी नगर, दांडी पाडा, लोखंडी पाडा, शिवाजी नगर, गणेश नगर, रावते पाडा, काटकर पाडा, संजय नगर, या बोईसर लगत असलेल्या झोपडपट्टी भागात मोठय़ा संख्येने दाटीवाटीने रहिवासी वस्ती तयार झाली आहे.

दिवसाआड पाणीपुरवठा

बोईसर आणि लगतच्या ग्रामपंचायत क्षेत्राला औद्योगिक विकास महामंडळ तारापूरमार्फत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र नवनवीन गृहनिर्माण प्रकल्प आणि झोपडपट्टया तयार होत असल्याने वाढत्या लोकसंख्येला नियमित पाणीपुरवठा करणे अशक्य झाले असून या भागांमध्ये दिवसाआड पाणी येते आहे.

कचऱ्याचे ढीग

बोईसर, सरावली, खैरापाडा, कुंभवली, पास्तळ, सालवड या ग्रामपंचायतमधून रोज पाच ते सहा टन टाकाऊ घनकचरा निर्माण होत आहे. याचे नियमित विघटन होण्यासाठी सक्षम यंत्रणा नसल्याने काही ठिकाणचा कचरा रस्त्याशेजारी पसरून मोठय़ा प्रमाणात कचऱ्याचे ढीग पाहण्यास मिळत आहेत.

२०१३ पासून आश्वासने

सन २०१३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बोईसर येथे दौरा केला असता नगर परिषद स्थापनेला अनुकूलता दर्शवली होती. जिल्हा निर्मितीनंतर नगर परिषद स्थापन होणे आवश्यक असल्याबाबत अनुकूल अहवाल तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी शासनाला सादर केला होता.  २०१८ साली पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी बोईसर येथील जाहीर सभेत तत्कालीन नगर विकासमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील   जाहीर आश्वासन दिले होते. याबाबत पालघर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीने ३० ऑक्टोबर २०२० रोजी ठराव घेऊन राज्याच्या नगरविकास विभागाकडे सुपूर्द केला होता. तर उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी साठ हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींनी मागणी केल्यास तेथे नगर परिषद किंवा नगरपालिकेला मान्यता दिली जाईल अशी घोषणा केली होती.

मुंबई उच्च न्यायालयामध्ये २०१६ साली मी याचिका दाखल केली होती. त्यावेळी न्यायालयामध्ये दोन सुनावण्या झाल्या. नगर विकास मंत्रालयाकडून निधी उपलब्ध नसल्याबाबत यावेळी सांगण्यात आले.  सध्या बोईसरची वाढती लोकसंख्या तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना  शहराचा पूर्ण इतिहास माहिती असल्याने त्यांनी आता बोईसर नगर परिषदेच्या स्थापनेचा मार्ग तात्काळ मार्गी लावावा. – नीलम संखे, माजी उपसरपंच बोईसर.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Only promises for formation of boisar municipal council zws
Show comments