पालघर : मुंबईसह उत्तरेच्या सागरी मासेमारी नियमन अंमलबजावणीसाठी फक्त दोन गस्ती नौका उपलब्ध आहेत. त्यातही ठाणे व पालघर जिल्ह्यासाठी फक्त एक गस्ती नौका उपलब्ध आहे. तर पालघर पोलिसांकडे असणाऱ्या स्पीड बोटींपैकी फक्त एक कार्यरत असून उर्वरित कंत्राटी पद्धतीने घेतलेल्या बोटींचा कालावधी संपुष्टात आला आहे. त्यामुळे सध्या पालघर जिल्ह्याच्या सागरी सुरक्षेचा भार केवळ दोन नौकांवर असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. दरम्यान, संपूर्ण मासेमारी हंगामासाठी कंत्राटी बोटींच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळणेही प्रलंबित आहे.
पालघर पोलिसांकडे चार स्पीड बोटी उपलब्ध असून त्यापैकी तीन सध्या नादुरुस्त आहेत. त्यामुळे एका बोटीच्या आधारे सागरी गस्त सुरू असून आणखी एक बोट पुढील महिन्यात सुरू होईल, असे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. तसेच पालघर पोलिसांनी सागरी वस्तीसाठी डहाणू येथे दोन तसेच सातपाटी व विरार येथे प्रत्येकी एक अशा चार गस्ती नौका भाडेतत्त्वावर घेतल्या होत्या. नोव्हेंबरपासून १०० दिवसांचा करारनामा असल्याने या बोटी २० मार्चपासून कार्यरत नसल्याची माहिती पुढे आली आहे. दुसरीकडे पश्चिम किनारपट्टीवरील पूर्ण हंगामासाठी १ ऑगस्ट ते ३१ मे (अंदाजे २४५ दिवस) या गस्ती नौका भाडेतत्त्वावर घेण्याबाबत प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात आला असला तरी त्याला अजूनही प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही.
दरम्यान, मुंबई व मुंबई उपनगर तसेच पालघर व ठाणे या चार जिल्ह्यांतील सुमारे २७० किलोमीटर लांबीच्या समुद्रकिनाऱ्यावर मासेमारी नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी तसेच बंदर क्षेत्रात देखरेख ठेवण्यासाठी फक्त दोन गस्ती नौका मत्स्य व्यवसाय विभागाकडे आहेत. त्यापैकी १२० किलोमीटर किनारा लाभलेल्या पालघर व ठाणे जिल्ह्यासाठी फक्त एक नौका असून या क्षेत्रात २६ मासेमारी बंदरे कार्यरत आहेत.
गस्ती नौकांचे महत्त्व
१२ नॉटिकल मैलांच्या अंतरापर्यंत होणारी बेकायदा मासेमारी तसेच या क्षेत्रात एलईडी, पर्ससीन व ट्रॉलरद्वारे होणारी मासेमारी रोखण्यासाठी या गस्ती नौकांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. निर्धारित सागरी सीमेचे उल्लंघन टाळणे व पर्यावरणपूरक पारंपरिक मच्छीमारांचे नुकसान होऊ नये या दृष्टीने समुद्रातील ही गस्ती महत्त्वपूर्ण आहे. सध्या मासळी उत्पादनासाठी चढाओढ सुरू असताना मुंबईच्या उत्तरेला गस्ती नौकांची संख्या वाढवावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
बारमाही गस्ती आवश्यक
पश्चिम किनारपट्टीवर १ जून ते ३१ जुलैदरम्यान मासेमारीबंदी कालावधी पाळला जात असला तरीही यादरम्यान अनेकदा काही मच्छीमार धोका पत्करून मासेमारी करताना आढळून आले आहेत. अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पावसाळ्याच्या कालावधीतदेखील पोलीस व मत्स्य व्यवसाय विभागाकडून गस्त कायम असावी, अशी अपेक्षा मच्छीमार बांधवांकडून केली जात आहे.
पालघर पोलिसांकडे चार स्पीड बोटी उपलब्ध आहेत. त्यापैकी तीन सध्या नादुरुस्त आहेत. त्यामुळे एका बोटीच्या आधारे सागरी गस्त सुरू आहे. आणखी एक बोट पुढील महिन्यात सुरू होईल.
बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर