लोकसत्ता प्रतिनिधी
पालघर: जिल्ह्यातील ४०० पेक्षा अधिक शाळांमध्ये शून्य अथवा एक शिक्षक कार्यरत असून ग्रामीण व दुर्गम भागातील शिक्षणावर परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूलभूत अधिकार मिळवण्यासाठी श्रमजीवी संघटनेने पालघर जिल्हा परिषद कार्यालयावर अज्ञानदिंडीचे आयोजन केले होते. “शिक्षणाची लावली पाटी, आम्हाला लावलं बकऱ्यांच्या पाठी”, “पुस्तके परत घ्या, बकऱ्या शेळ्या द्या” अशी मागणी करत विद्यार्थी व पालक जिल्हा परिषद कार्यालयात धडकले.
जिल्ह्यातील प्राथमिक शाळांसाठी ७२५० मंजूर पदांपरेची २१३२ पदे रिक्त असून २८ शून्य शिक्षकी शाळा तर ३३५ एक शिक्षकी शाळा सध्या जिल्ह्यात कार्यरत आहेत. या व्यतिरिक्त आंतर जिल्हा बदलीसाठी ४८६ तर विकल्प वितरित २१८ शिक्षक बदलीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यापैकी अनेक शिक्षक हे बदलीसाठी प्रयत्न करत असल्याने अधून मधून रजेवर जात आहेत. शाळा सुरू होऊन तीन आठवड्याचा कालावधी उलटला असला तरी अनेक ठिकाणी शिक्षणाची बिकट परिस्थिती असल्याचे दिसून आले आहे.
आणखी वाचा-प्रसंगावधानामुळे चिमुकलीचे प्राण वाचले, पालघर तालुक्यातील माहीम येथील घटना
सर्व मुलांना विद्यार्थ्यांचा मूलभूत अधिकार राज्य शासनाने दिला असताना शिक्षकांच्या अभावी पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी शिक्षणावर परिणाम झाला आहे. शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी शासन विचाराधीन असले तरीही हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिला आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत जिल्ह्यातील या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने त्याकडे लक्ष वेधण्यासाठी श्रमजीवी संघटनेने जिल्हा परिषद कार्यालयावर अज्ञानदिंडी चे आयोजन केले होते.
पालघर नगरपरिषद कार्यालयाच्या आवारातून निघालेल्या दिंडीत विद्यार्थी विटी दांडू, चेंडू, बेचक्या, गोट्या व इतर खेळाचे साहित्य सोबत घेऊन सहभागी झाले होते. शासनाने पुस्तक परत घेऊन आम्हाला बकऱ्या मेंढ्या चारण्यासाठी देण्याची मागणी करीत जिल्हा परिषद कार्यालयावर धडकले. या अभिनव आंदोलनात चिमुकल्यासह त्यांचे पालक, श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.