ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रमेश पाटील

वाडा:  गतवर्षीप्रमाणेच या वर्षीही परतीच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातीतोंडी आलेला घास हिरावला जाऊ लागला आहे. काही शेतकऱ्यांचे कापणीस आलेले भातपीक पावसाने आडवे केल्याने ते कुजून चालले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी आणि जिल्ह्य़ात ओला दुष्कार जाहीर करण्याची मागणी शेतकरी करू लागले आहेत.

पालघर जिल्हा हे भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते. मुंबईच्या लगत असलेल्या या  जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर औद्योगिकीकरण झालेले असले तरी येथील पूर्वजांपासून सांभाळून ठेवण्यात आलेले भातशेतीचे क्षेत्र कमी झालेले नाही. खते, बियाणे, मजुरी, अवजारे या खर्चात प्रचंड दरवाढ झालेली असतानाही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठय़ा कष्टाने भातशेती आजवर त्याच जोमाने केली आहे.

खरीप हंगामात पालघर जिल्ह्यात भात हे एकमेव पीक मोठय़ा प्रमाणावर घेतले जाते. ८० ते ८५ हजार हेक्टर क्षेत्रावर घेतल्या जाणाऱ्या या भातपिकाला गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने नैसर्गिक संकटाशी सामना करावा लागत आहे. पीक विमा कंपन्यांनीदेखील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई न देता तोंडाला पाने पुसण्याचेच काम केले आहे, त्यामुळे शेतकरी आणखी संकटात सापडला आहे.

 समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे गेले दोन दिवस हलक्या स्वरूपात कोसळत असलेल्या परतीच्या पावसाने मंगळवारी जोरदार सुरुवात केली. या पावसाने कापणीस आलेल्या भातपिकांचे प्रचंड नुकसान केले आहे. दाण्याने भरलेली कणसे पाण्यात कुजून चालली आहेत. लोंबीतील दाण्यांना कोंब फुटू लागले आहेत. जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड या भागांत मोठय़ा प्रमाणावर केल्या जाणाऱ्या भातपिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे.

संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने वेळीच मदत केली नाही तर शेतकरी उद्ध्वस्त होईल, अशी भीती आहे. 

-नारायण ठाकरे, वावेघर, ता. वाडा.

नैसर्गिक आपत्तीत प्रशासन नेहमीच शेतकऱ्यांना मदत करीत आले आहे. शासनाचे याबाबतचे आदेश येताच पंचनामे सुरू करण्यात येतील. 

-मिलिंद जाधव, उपविभागीय कृषी अधिकारी वाडा, जि. पालघर.

पावसामुळे अनेक ठिकाणी भातशेतीमध्ये पाणी भरले आहे. काढणीसाठी आलेले भातपीक खराब झाले आहे. त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paddy farming in crisis again ssh