रमेश पाटील
वाडा : वाडा तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओगदा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील पाडय़ांना धरण जवळ असतानाही पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. पाडय़ांपासून मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर धरण अवघे एक ते दोन किलोमीटर अंतरावर असताना त्यांच्यावर अशी वेळ आली आहे.
तालुक्यातील ओगदा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील दिवेपाडा, सागमाळ, जांभूळपाडा, टोकरेपाडा, घोडसाखरे, तसेच तुसे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणारे फणस पाडा, दोडेपाडा व डाडरे निहाळी या पाडय़ामध्ये दरवर्षी मार्चअखेरीपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू होते. जवळच पाण्याचे स्रोत असतानाही या ठिकाणी नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली जात नाही. वाडा तालुक्याला पाच नद्यांची नैसर्गिक देणगी असूनही तालुक्यातील अनेक गाव- खेडय़ांतील महिलांना उन्हाळय़ातील दोन ते तीन महिने तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. वाडा तालुक्यात सरासरी पर्जन्यवृष्टीचे प्रमाण २५०० ते ३००० मिलीमीटर इतके आहे. मोठय़ा प्रमाणात पडणाऱ्या पावसाचे तसेच नद्यांचे पाणी अडवण्यासाठी तालुक्यात एकही धरण नाही.
परिसरात रोजगार हमीची कामे सुरू आहेत, मात्र घरात पिण्यासाठी पाणी नसल्याने या महिलांना रोजगार सोडून पाण्याच्या शोधात फिरावे लागत आहे.
दरम्यान, पाणीटंचाई भागात देण्यात आलेले टँकर आठवडय़ात एक ते दोन वेळा येते. उर्वरित दिवशी येथील महिलांना वणवण करावीच लागते, असे सामाजिक कार्यकर्ते रोहिदास शेलार यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. तर वाडा तालुक्यात ओगदा व तुसे या दोन ठिकाणी टँकरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे वाडा पंचायत समितीचे सभापती रघुनाथ माळी यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा


प्रस्तावित धरणे मुंबईसाठी

तालुक्यात प्रस्तावित असलेली गारगाई व पिंजाळ ही दोन्ही धरणे मुंबईतील वाढत्या लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी बांधली जाणार आहेत. वाडा तालुकाशेजारी असलेल्या मोडकसागर, वैतरणा या धरणातील पाणीसाठय़ावर या परिसरातील आदिवासी पाडय़ांसाठी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित होऊ शकते, मात्र तसा प्रस्ताव आजवर कुणीच मांडलेला नाही.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pade thirsty near dam wanwan wate wada taluka gram panchayat modaksagar dam amy