पालघर : एका बावीस वर्षीय तरुणीने घरफोडी करून पळून जाणाऱ्या दोन चोरट्यांपैकी एका चोराला मोठ्या धाडसाने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणातला अन्य एक साथीदार सोन्याचे दागिने घेऊन लंपास झाला असला तरीही तरुणीने धाडस दाखवल्यामुळे एक आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आले आहेत.पालघर येथील आदर्श नगर येथील वसंत विहार या इमारतीत फुलांचा व्यवसाय करणारे चव्हाण कुटुंबीय राहत आहेत. काल सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास मागील वर्षी लग्न झालेले काजल चव्हाण (२२) व तिचे पती हितेश चव्हाण हे दोघे बाहेर फिरायला गेले होते. त्यानंतर सहा वाजल्याच्या सुमारास काजल हिच्या सासू गीता चव्हाण देखील घराला कुलूप लावून पतीसोबत फुलांच्या दुकानात गेल्या.
सात वाजल्यानंतर घरात कोणी नसल्याचा अंदाज घेऊन दोन अज्ञात चोरटे कुलूप अडकवण्याची कडी खोलून घरात शिरले. पहिल्या मजल्यावरील इतर दोन घरांमध्ये कोणी राहत नसल्याने ते बंद होते. तर शेजारच्या घरातले कोणी बाहेर येऊ नये या दृष्टीने शेजारच्या घराच्या दरवाजाला चोरट्यांनी बाहेरून कडी लावली.घरातील दोन्ही कपाटातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम चोरट्यांनी आपल्या जवळील बॅगमध्ये भरण्यास सुरुवात केली. साडेसात ते आठ वाजताच्या दरम्यान काजल व तिचे पती परत आले. काजल ही पुढे निघून आली तर पती गाडी पार्किंग मध्ये लावण्यास गेले. दरवाजाचे कुलूप उघडे दिसल्यामुळे काजल हिने दरवाजा उघडताच घर अस्ताव्यस्त दिसले. तर बाहेरच्या खोलीत पाठीवर बॅग घेऊन उभ्या असलेल्या चोराने तिला आवाज न करण्याची धमकी दिली. तर दुसरा साथीदार आत मधल्या खोलीत हालचाल करत असल्याचा तिच्या निदर्शनास आले. ती आरडाओरडा करणार या वेळातच बाहेरच्या खोलीतील चोर तिला धक्का देऊन व तिच्या डाव्या हातावर लोखंडी अवजाराने मार देऊन पळून गेला.
तेवढ्यात आतील खोलीमधे असलेला आरोपी बाहेर आला.यावेळी काजल हिने त्याला पकडण्यासाठी झटापट केली. त्याचा पाय घट्ट पकडून ठेवल्यामुळे त्याला पळता येत नसल्याने तो तिला फरपटत दरवाजा बाहेरील लिफ्ट पर्यंत घेऊन गेला. तेवढ्यात तिने आरडाओरडा केल्यामुळे इमारतीतील इतर रहिवासी व तिचा पती मदतीला धावून आले. सर्वांनी त्या चोराला पकडून त्याचे पाय बांधून ठेवले. याबाबत पोलिसांना कळविल्यानंतर साडेआठ वाजताच्या सुमारास पोलिस दाखल झाले.
या घटनेमध्ये काजल हिच्या हाताला मार लागला आहे. तर पळून गेलेल्या चोरट्याने काजल हिचे सर्व दागिने चोरी करून नेले असून दुसऱ्या पकडलेल्या चोराकडे काही रोख रक्कम व तिच्या सासू गीता चव्हाण हिचे काही दागिने सापडले आहेत. हे दोन्हीही चोर रिक्षा मधून आल्याचा प्रथमदर्शनी अंदाज आहे. याबाबत पुढील तपास पालघर पोलिस करत आहेत. आम्ही बाहेर गेलो होतो. काजल घरी परत आली तेव्हा घरात चोरी सुरू होती. तिने धाडसाने चोराला पकडलं. आम्ही तिला अभिमानाने पाहतो असे तिच्या सासू गीता चव्हाण यांनी सांगितले.
इमारतीत एकही सीसीटीव्ही कॅमेरे नाही
आदर्श नगर मध्ये असलेल्या पुष्प विहार व वसंत विहार या इमारतीत तसेच इतर विंग मध्ये देखील एकही सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आलेला नाही. सुरक्षेच्या दृष्टीने अनेक ठिकाणी, इमारतींमध्ये, रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक असून सीसीटीव्ही द्वारे चोरट्यांची ओळख पटविणे सोपे होते.