पालघर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत नळपाणी योजना उभारताना खाजगी मालकीची जागा परस्पर वापरण्यासाठी ग्रामपंचायतीने केलेल्या प्रयत्नाला जमीन मालकांनी विरोध केल्याने डहाणू तालुक्यातील आंबोली जवळ सिसने मालपाडा येथील पाच कुटुंबातील ४० आदिवासी बांधवांना गावकऱ्यांनी बहिष्कृत केले आहे. हे बांधव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारपासून उपोषणाला बसले असून संबंधिताविरुद्ध कारवाई करण्याचे जिल्हा प्रशासनाने आश्वासन दिले आहे.
सिसने गावात नळपाणी योजना उभारताना पाण्याच्या टाकीसाठी लागणाऱ्या चार गुंठे जागेची आवश्यकता होती. या गावातील शनवार कुटुंबीयांच्या ताब्यात असणाऱ्या खासगी मालमत्तेमध्ये टाकी उभारण्याचे गावकऱ्यांनी नियोजन केले होते. या संदर्भात १९ नोव्हेंबर २०२३ रोजी मोजणी करून २९ नोव्हेंबर रोजी झालेल्या ग्रामसभेच्या ठरावात या खाजगी जागेचा टाकी उभारण्यासाठी वापर करण्याचे निश्चित करण्यात आले. या ग्रामसभेत जमीन मालक असणाऱ्या शनवार कुटुंबीयांनी या कृतीला विरोध केला.
हेही वाचा : पालघरमध्ये भाजपच्या तयारीनंतरही शिंदे गट ठाम
१३ डिसेंबर रोजी नळ पाणी योजनेच्या दृष्टीने सपाटीकरण व वृक्षतोड हाती घेण्यात आली असून सुमारे १०० ते १२५ सागाची झाडे कोणताही मोबदला न देता तोडून त्या ठिकाणी सपाटीकरण व रस्त्याच्या पाण्याचे काम सुरू केले आहे. जागा मालकांनी टाकी उभारण्याच्या कामासाठी विरोध केला असता त्यांचा विरोध दाबून काम सुरू ठेवल्याने बाधित कुटुंबीयांनी स्थानिक स्तरावर तक्रारी दाखल केल्या आहेत. दरम्यान या कामासाठी जागा मालकाची परवानगी नसताना १७ जानेवारी २०२३ रोजी कामाचा कार्यादेश महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून देण्यात आल्याचे दिसून आले आहे.
हेही वाचा : वडील पोहोचताच जखमी हर्षदने सोडले प्राण; एसटी महामंडळ, ट्रक मालकाचा बेजबाबदारपणा उघडकीस
दरम्यान पिण्याच्या पाणी प्रकल्पाला मदत करत नसल्याने गावकऱ्यांनी पाच शनवार कुटुंबीयांतील ४० सदस्यांना वाळीत टाकले असून त्यांच्या वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याला दगड व दोरी बांधून बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिवाय सामुदायिक विहिरीतून पाणी पिण्यासाठी मज्जाव करण्यात येत असून विद्यार्थ्यांना शाळेत पाठवल्यास बघून घेऊ असेही सांगण्यात आले आहे. यापैकी एक कुटुंब आपला उदरनिर्वाह किराणामाल दुकानाद्वारे करत असताना या दुकानातून खरेदी केल्यास १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल, असे ग्रामस्थांना बजावले जात असल्याचे ताई शनवार यांनी पालघर येथे उपोषण ठिकाणी लोकसत्ताला सांगितले. याप्रकरणी तक्रार केल्यास वीज पुरवठा खंडित करू असे देखील या कुटुंबीयांना धमकवण्यात आल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा : किरकोळ भांडणावरून चुलत मामाकडून भाच्याचा खून, आरोपीने यापूर्वी केला होता पत्नीचा खून
या संदर्भात जिल्हा परिषदेशी संपर्क साधला असता पंचायत समिती यांच्यामार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल व या ठिकाणी निर्माण झालेला वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगण्यात आले. या संदर्भात पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याशी संपर्क साधला असता दोन्ही गटांमध्ये समन्वय साधण्यासाठी स्थानिक पोलिसांच्या प्रयत्नांना प्रथम यश आले होते. नंतर काही स्थानिक संघटनांच्या माध्यमातून हा वाद पुन्हा चिघळविण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात आले. शनवार कुटुंबीयांवर बहिष्कार टाकण्यात आला असल्याचे उघडकीस झाल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल असे पोलीस अधीक्षक यांनी लोकसत्तेला सांगितले.