बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एका रासायनिक कारखान्यामध्ये अपघात होऊन पाच कामगार जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमी कामगारांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक एन.९० वरील कॅलीक्स केमिकल या रासायनिक कारखान्यामध्ये शुक्रवारी दुपारी १.४५ वाजेच्या सुमारास उत्पादन प्रक्रिया सुरू असताना ड्रायरचे तापमान अचानक वाढून त्याचा स्फोट झाल्याने आगीचा भडका उडाला. या अपघातात ड्रायरमधील रासायनिक पदार्थ शरीरावर पडून राजमनी मौर्य, पवन देसले, आदेश चौधरी, निशिकांत चौधरी आणि संतोष हिंडलेकर हे पाच कामगार गंभीररीत्या भाजले आहेत. रासायनिक पदार्थ अंगावर पडल्याने कामगारांचा चेहरा आणि हात पाय भाजले असून त्यांना उपचारासाठी औद्योगिक क्षेत्रातील खाजगी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले आहे. कारखान्यामधील अपघाताची घटना समजताच तारापूर अग्निशमन दलाने तातडीने पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. अपघातस्थळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश अस्वार यांनी भेट देऊन पाहणी केली.

हेही वाचा – शहरबात : पंतप्रधानांचा लाभदायी दौरा

हेही वाचा – बड्या उद्योगासाठी ‘एमआयडीसी’कडून भूसंपादन? वाढवण बंदराजवळील १२०० एकर जमिनीची वस्त्रोद्योग केंद्रासाठी निवड

कॅलीक्स केमिकल्स कारखान्याची अग्निशमन यंत्रणा कुचकामी?

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कॅलीक्स केमिकल या कारखान्यात अपघात होऊन आग भडकल्यानंतर त्यावर तातडीने नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक असलेली कारखान्याची अग्निशम यंत्रणा कुचकामी असल्याची माहिती पुढे आली आहे. कॅलेक्स केमिकल्स कारखान्यात लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शेजारील ग्लेन्फिन केमिकल्स या कारखान्याच्या अग्निशमन यंत्रणेचा वापर करण्यात आला.