लोकसत्ता प्रतिनिधी
पालघर : पायाभूत सुविधांचा स्तर उंचावल्याने मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मिरा रोड या ठिकाणी गेल्या काही वर्षात झालेल्या झपाट्याने विकासाकडे पाहता पालघर व बोईसर हे आगामी काळात विकासाचे केंद्रबिंदू (हॉटस्पॉट) राहील असे क्रेडाय एमसीएचआय चे सचिव धवल अजमेरा यांनी प्रतिपादन केले.
पालघर बोईसर क्रेडाय एमसीएचआय तर्फे पालघर येथे आयोजन करण्यात आलेल्या प्रॉपर्टी उत्सवाचे धवल अजमेरा यांच्यातर्फे उद्घाटन करण्यात आले. ६ एप्रिल पर्यंत सुरू असणाऱ्या या प्रॉपर्टी उत्सवात ५० पेक्षा अधिक विकासकांनी सहभाग घेतला असून त्यांचे ७० गृह संकुल प्रकल्पांची माहिती या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहे. या प्रदर्शनात असणाऱ्या विविध दालनांमधून ३००० पेक्षा अधिक सदनिका, गाळे विक्रीसाठी उपलब्ध असून पालघर, बोईसर मध्ये अशा प्रकारच्या क्रेडाय एमसीएचआय ने केलेला हे दुसरे प्रॉपर्टी प्रदर्शन आहे.
पायाभूत सुविधांवर एखाद्या भागाचा विकास अवलंबून होत असून महामार्ग राज्य मार्गांसह विविध फुलांची उभारणी समुद्री मार्गे मुंबई शहराशी सहजगत संपर्कात येण्याची संधी याकडे पाहता पालघर व बोईसर हे मुंबई महानगर क्षेत्रातील आगामी काळातील हॉटस्पॉट ठरेल असे त्यांनी प्रतिपादन केले. या परिसरातील विकासकांकडून ग्राहकांना किफायतशीर दरात दिल्या जाणाऱ्या सुविधा यामुळे आपण प्रभावित झाल्याचे सांगत परिसराच्या विकासासाठी पालघर व बोईसर परिसरात पोषक वातावरण असल्याचे त्यांनी सांगितले.
नवी मुंबई येथील विकासाशी जवळून निगडित असणारे विजय लक्ष्यांनी यांनी क्रेडाय एमसीएचआय या संस्थेमार्फत विकासकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील असे उपस्थित व्यावसायिकांना आश्वासन दिले. वाशी येथील सेक्टर १७ चे उदाहरण देत पायाभूत सुविधांच्या विकासामुळे नवी मुंबईचा झालेला विकास आपण डोळ्यांनी पाहिल्याने पालघर व बोईसर पुढील तीन ते पाच वर्षात झपाट्याने विकसित होईल असे प्रतिपादन केले.
पालघर लगत सिडको ला देण्यात आलेल्या भूखंडाचा विकास सुरू झाल्यानंतर येथील मालमत्तेचे दर झपाट्याने वाढतील असा सुतोवाच करत पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी शासकीय यंत्रणेकडे पाठपुरावा करावा लागेल असेही त्यांनी सांगितले. विकासात व बिल्डिंग व्यवसायिकांनी एकत्र राहणे, दूरदृष्टी ठेवणे तसेच स्वतः पुढाकार घेऊन स्वतःमध्ये व परिसरात सुधारणा करून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रॉपर्टी उत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी पालघर बोईसर क्रेडाय एमसीएचआय अध्यक्ष प्रशांत खंडेलवाल यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी मुद्रांक जिल्हाधिकारी दीपक पाटील, एसबीआयचे वरिष्ठ व्यवस्थापक विक्रम नेगी, अशीच शहा, हर्षद सावला आदी मान्यवर उपस्थित होते.