पालघर : वैतरणा नदीवरील रेल्वे पुलाच्या दुतर्फा दोन किलोमीटर परिसरात रेती उत्खननावर बंदी असताना पोलिसांकडून व महसूल अधिकाऱ्यांकडून गेल्या महिन्याभरात कोणतीही कारवाई झाली नाही. अखेर ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन पुलालगत गैरपद्धतीने उत्खनन करणाऱ्या बोटींना पकडून प्रशासनाच्या ताब्यात दिले.

वैतरणा पुलाची सुरक्षा धोक्यात आल्याचा अहवाल पश्चिम रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केल्यानंतर तसेच पश्चिम रेल्वेच्या सूचनेनुसार पालघरचे जिल्हाधिकारी यांनी ४ मे रोजी वैतरणा पुलाच्या दुतर्फा दोन किलोमीटर परिसरात कोणत्याही प्रकारचे नौकानयन करण्यावर बंदी आणली होती. तसेच या पुलाखाली पोलिसांनी पहारा ठेवून कारवाई करण्याचे पोलीस तसेच महसूल विभागाला सूचित करण्यात आले होते. तरी देखील या पुलाच्या परिसरात व लगतच्या भागातील रेती व्यवसायिक रात्रीच्या वेळी गैरपद्धतीने रेती उत्खनन करत असल्याचे निदर्शनास आल्याने ग्रामस्थाने रात्रीची गस्त ठेवली होती.  वाढीव बेटाचा भाग पोखरून त्याखाली असलेल्या रेती साठा उत्खनन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका बोटीला ग्रामस्थांनी पकडून देऊन महसूल विभागाच्या स्वाधीन केले.   वाढीव ग्रामस्थांच्या सतर्कतेने गैर मार्गावरील उत्खननावर रोख लावण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून आले आहे.

पाण्याचा प्रश्न गंभीर : वैतरणा नदीने सर्व बाजूंनी वेढलेल्या वाढीव बेटाचे कडेचा भाग रेती उत्खनन करणाऱ्या व्यवसायिकांनी पोखरून काढल्याने बेटाचे क्षेत्रफळ कमी होत आहे. परिणामी बेटावरील गोडय़ा पाण्याच्या विहिरी निमखाऱ्या व मचूळ झाल्याने बेटावरील रहिवाशांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.  वैतीपाडा येथे पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. आपल्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाल्याने येथील रहिवाशांनी नाईलाजाने रात्रीची गस्त करणे सुरू करून गैरमार्गाने रेती उत्खनन करणाऱ्यांविरुद्ध रोख लावण्याचा प्रयत्न करत असल्याचे वाढीवच्या सरपंच दीपिका राठोड यांनी लोकसत्तेला सांगितले.

Story img Loader