पालघर : शाळेत येण्यास पाच मिनिटांचा विलंब झाल्यामुळे पालघर येथील एका नामांकित शाळेच्या मुख्याध्यापिकेने दहावी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला ५० उठाबशा काढण्याच्या दिलेल्या शिक्षेमुळे त्या मुलीवर आजारपण ओढवले आहे. त्या मुलीवर गेल्या तीन दिवसांपासून खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून २० दिवसांवर दहावीची परिक्षा आली असताना या प्रकाराबाबत पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पालघर शहरातील भगिनी समाज विद्यालयातील दहावी इयत्तेत शिकणारी पालघर (टेंभोडे) येथील राहणारी १३ वर्षीय विद्यार्थिनीला १७ जानेवारी रोजी सकाळी शाळेत येण्यास पाच मिनिटांचा विलंब झाला. यामुळे शाळेच्या मुख्याध्यापिकेने त्या मुलीला ५० उठाबशा काढायला लावल्या. उठाबशा काढल्यानंतर त्या मुलीच्या पायात व मांड्यांमध्ये गोळे आले व पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर काही वेळाने उलटीचा झाल्याने या विद्यार्थिनीला पालघर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा – डहाणू : महालक्ष्मी गडावर गेलेल्या भाविकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

घडलेल्या प्रकाराबाबत मुलीच्या पालकांनी पालघर पोलीस स्टेशन येथे १९ जानेवारी रोजी तक्रार दाखल केली. दोन्ही पक्षांना पोलीस निरीक्षक अनंत पराड यांनी आज जबाबासाठी पालघर पोलीस स्टेशन येथे बोलाविले होते. याच मुलीने यापूर्वी शाळेत बुट घातले नसल्याने मासिक पाळी सुरू असताना मैदानावर पळविण्याची शिक्षा दिली होती, अशी माहिती मुलीच्या आईने पोलिसांसमक्ष दिली. यावेळीसुद्धा तिला त्रास झाल्याचे पालकांनी उपस्थितांच्या निदर्शनास आणून दिले.

या प्रकाराबाबत गुन्हा दाखल होण्याची स्थिती निर्माण झाली होती. मात्र पीडित मुलीने रुग्णालयातून पालकांना संपर्क करून तक्रार दाखल करू नये अशी विनंती केली. त्यामुळे सामंजस्याने पालकांनी तक्रार मागे घेतल्यामुळे संबंधितांविरुद्ध कारवाई टळली. मात्र अशा प्रकारचे अघोरी कृत्य पुन्हा होणार नाही याची काळजी घेण्यात यावी अशी सक्त ताकीद पोलीस निरीक्षक अनंत पराड यांनी शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना दिली. या शाळेतल्या काही पुरुष शिक्षकांकडून स्टीलच्या पट्टीने विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांना मारल्याच्या तक्रारी पालकांकडून करण्यात आल्या होत्या.

हेही वाचा – शहरबात: रेल्वे प्रवासी उपेक्षित

याबाबत भगिनी समाज विद्यालयाच्या माध्यमिकच्या मुख्याध्यापिका प्रणिता वर्तक यांच्याशी संपर्क साधला असता आपण या मुलीला भेटायला रुग्णालयात गेल्याचे या प्रकरणात सामंजस्याने तक्रार मागे घेण्यात आली आहे, असे सांगितले. तसेच असे प्रकार यानंतर शाळेत कधीही होणार नसल्याचे त्यांनी लोकसत्ताला सांगितले.

दहावीची परीक्षा अवघ्या २० दिवसांवर येऊन ठेपली असताना आपली कन्या अद्याप रुग्णालयात दाखल असल्याने या शिक्षेमुळे तिचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे असे मत तिच्या पालकांनी व्यक्त केले.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Palghar class 10 girl student punished for five minutes late in school has been in the hospital for three days ssb