कासा: डहाणूहून चारोटी दिशेला जात असलेला दुचाकी चालकाचा अपघात होऊन दुचाकीसह चालक कालव्यात पडून वाहून गेल्याची घटना घडली असून या अपघातात दुचाकीवर मागे बसलेले दोन तरुण जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास डहाणू जव्हार राज्य मार्गावरील सारणी येथे हा अपघात घडला.

कासा पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित दुचाकीस्वार हा डहाणूहून निघाल्यानंतर आशागड येथे योगेश नागरे (२९) व तेजस नागरे (२८) या आंबेसरी गेटी पाडा येथील दोन तरुणांना आपल्या दुचाकीवर बसवून चारोटीकडे निघाले होता. रात्री दहा वाजेच्या सुमारास सारणी येथे आला असता सूर्या कालव्याजवळील तीव्र वळणावर नियंत्रण सुटल्याने दुचाकीचालक दुचाकीसह कालव्यामधून वाहत असलेल्या पाण्यात पडला. या अपघातात दुचाकीस्वाराच्या मागे बसलेले दोघेजण रस्त्याच्या कडेला पडून जखमी झाले. ज्ञात दुचाकी चालक आपल्या दुचाकीसह सूर्या कालव्याच्या वाहत्या प्रवाहात खालच्या दिशेने वाहून जात बेपत्ता झाला आहे. अपघात रात्री घडल्याने बेपत्ता दुचाकी चालकाचा अंधारात शोध घेणे शक्य झाले नाही.

कासा पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने आज सकाळपासून सूर्या कालव्यामध्ये दुचाकी चालकाचा शोध घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या अपघातात जखमी झालेल्या दोघांची दुचाकी चालकासोबत कोणतीही ओळख नसल्याने दुचाकी चालकाची ओळख पटवणे अवघड झाले आहे. दरम्यान, योगेश व तेजस नागरे हे दोघे तरुण जखमी असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी मदतकार्य करत जखमींना तातडीने उपचारासाठी हलवले.

डहाणू जव्हार राज्य मार्गाला छेदून जाणाऱ्या सूर्या कालव्यालगत सुरक्षा कठडे नसल्याने पूर्वीही अपघाताच्या घटना घडल्या असून स्थानिक नागरिकांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगनर्जीपणावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

कालव्यांतील अपघातांचे सत्र सुरूच :

दोन दिवसांपूर्वी दक्ष मर्दे या विद्यार्थ्यांचा सारणी येथील कालव्यात पोहताना दुर्दैवी मृत्यू झाला. तर सूर्या नदीवरील मासवन बंधाऱ्यात बुडून तरुणाचा बळी गेला होता. सध्या डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी देवीची मोठी यात्रा सुरू आहे. त्यातच शाळा महाविद्यालयांना उन्हाळी सुट्ट्या लागल्या असून उन्हामुळे हैराण झालेले जिल्ह्यातील तरुण, शालेय विद्यार्थी महालक्ष्मी यात्रेच्या निमित्ताने परिसरातील सारणी, चारोटी, रानशेत, वेती, सोनाळे, वाघाडी या गावातून वाहत असलेल्या सूर्या प्रकल्पाच्या कालव्यांमध्ये पोहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. वाहत्या प्रवाहात पोहण्याचा सराव नसताना अनेक जण पाण्यात डुंबण्याची मजा घेताना दिसत असून या ठिकाणी जीवरक्षक, लाईफ जॅकेट इत्यादी सुरक्षा उपाययोजना नसल्याने अपघाती घटना वाढत आहेत. या निमित्ताने कालव्यावरील पोहण्याच्या प्रसिद्ध ठिकाणी सुरक्षा उपाययोजनेचे माहिती फलक लावण्याची मागणी होत आहे.