पालघर : पालघर जिल्हा सायबर गुन्हे मुक्त करण्याच्या मनोदय पाठोपाठ जिल्हा दोन महिन्यात स्वच्छ, दुर्गंधी मुक्त करण्याच्या दृष्टीने प्लास्टिक बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या निर्धार पालकमंत्री गणेश नाईक यांनी पालघर येथील जनता दरबार दरम्यान व्यक्त केला. ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या हद्दीत प्लास्टिक मुक्ती करू शकणार नाही त्याचे शासकीय अनुदान बंद करण्यात येईल असे सज्जड दम भरला.
पालघरचे पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर दुसऱ्या जनता दरबारचे आयोजन आज (ता २८) जिल्हा नियोजन भवनात करण्यात आले होते. त्या प्रसंगी पालक मंत्री उपस्थितांना संबोधित करताना बोलत होते.
राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना थेट घोडबंदर – वर्सोवा पासून पालघर जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत प्रवास करताना राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा व विविध ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये साचलेला कचऱ्याच्या ढिगारे पाहून आपण व्यथीत झाल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.
पालघर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये स्वच्छता तसेच दुर्गंधी मुक्त करण्यासाठी पालघर स्वच्छ व प्लास्टिक मुक्त जिल्हा अभियानाचा शुभारंभ केला. पुढील दोन महिन्यात याची प्रभावी अंमलबजावणी न झाल्यास ग्रामपंचातीचे शासकीय अनुदान बांधकारण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
परिसरातील स्वच्छता राखण्यासोबत जिल्हा दुर्गंधी मुक्त करण्यासाठी उपाय सुचविताना पालकमंत्री यांनी पावसाच्या पाण्याचा तसेच सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी व्यवस्था करण्याची सूचना ग्रामपंचायतींना दिली. सांडपाण्यामधून दुर्गंधी दूर करण्यासाठी त्यांनी केळीची लागवड करण्याच्या सूचना दिलेल्या.
सुरंगीची करणार लागवड
तळ कोकणात सुरंगी झाडांना उष्माच्या दोन महिन्यात येणाऱ्या सुगंधी फुलांमुळे परिसर प्रफुलित होत असतो. या धर्तीवर पालघर जिल्ह्यात वन विभागातर्फे जिल्ह्यात किमान ५००० सुरंगीची झाडं लावण्याचा मनोदय वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार द्यावे जाहीर केले.
जिल्हा नशा मुक्त करणार
गणेश नाईक यांनी आपल्या महाविद्यालयीन दिवसांच्या काळात धूम्रपान करण्यासाठी दूरवर आडोशाला जाण्याची पद्धत होती. नंतर समाजात वावरताना ती व्यक्ती किमान दोन अनेकदा चूळ भरून पुढे येत असत. पण सध्यस्थितीत महाविद्यालयाने विद्यार्थीच नव्हे तर शालेय विद्यार्थी देखील सिग्रेट राजरसपणे ओढताना दिसत असून अनेकदा त्यामध्ये नशा देणाऱ्या अमली पदार्थांचा सेवन होत असल्याचे दिसून येत असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले. यावर रोख लावण्यासाठी पोलीस अधीक्षक यांनी आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत शाळा महाविद्यालयांसमोर असणाऱ्या पान टपऱ्या यांच्यावर छापे टाकून जिल्हा पुढील दोन महिन्यात नशा मुक्त करावा अशा प्रकारच्या सप्त सूचना दिल्या. दृष्टाला दृष्टाप्रमाणेच वागणूक द्यायला हवी असे सांगत ही कारवाई करताना कोणी वरिष्ठांची शिफारस आणल्यास त्यांना माझ्याशी बोलण्यास सांगा असे गणेश नाईक यांनी जाहीरपणे सांगितले.