पालघरः जन्मापासून आजारपणाने ग्रासलेल्या व अनेक प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कृष्णा वाढेर या पालघरच्या कन्येला विशेष प्रभाव (स्पेशल इफेक्ट्स) विभागात दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. चेहरा तसेच शरीरातील विविध भागांवर वैशिष्ट्यपूर्ण सजावट करून नवीन कला प्रकाराचा आविष्कार त्यांनी केला असून आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे.
नोकरीनिमित्त पालघर येथे आलेल्या वाढेर कुटुंबात जन्मलेली कृष्णा हिला जन्मापासूनच आजारपणाने ग्रासले होते. १२ व्या दिवसापासून सात वर्षापर्यंत मुंबईच्या केईएम रुग्णालयातील बाल विभागात उपचारासाठी दाखल असलेल्या कृष्णाच्या बाल मनावर तेथे उपचारासाठी येणार्या भाजलेल्या व आजाराने ग्रासलेल्या इतर रुग्णांच्या सहवासात राहून प्रभाव झाला. त्यामुळे लहानपणापासून मृत्यू डोळ्यासमोर पाहिल्याने तिच्या मनातली भीती वाटण्याचा प्रकार संपुष्टात आला.
हेही वाचा >>> पालघर : जिल्ह्यातील ३२५ माध्यमिक शाळांनी घेतली मकर संक्रांतीची सुट्टी
पालघरच्या आर्यन शाळेत गुजराती माध्यमात शालेय शिक्षण व नंतर सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात बारावीपर्यंतचे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी सन २०११ मध्ये सीए परीक्षा उत्तीर्ण केली. मात्र सीए कृष्णा कधीही त्या क्षेत्रात रमल्या नाहीत. त्याच दरम्यान आजारपणाने पुन्हा एकदा त्यांना ग्रासले असताना त्यातून सावरून यांनी शिक्षण घेतलेले क्षेत्र सोडून लहानपणीपासून आवडणारे वेशभूषा व सजावट क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला.
प्रारंभी एका अमेरिकन कंपनीत त्वचेशी संबंधित उत्पादनाच्या विक्रीशी संदर्भात काम करताना त्यांनी मेकअप क्षेत्रातील उज्ज्वल संधीचा अंदाज बांधला. त्यानंतर बालाजी टेलीफिम्समध्ये तीन वर्ष वैयक्तिक सजावट क्षेत्रातील अनुभवातून या क्षेत्रातील बारकावे समजून घेत स्वतःच्या कल्पना शक्तीच्या आधारे या क्षेत्रात नवनवीन प्रयोग करण्यास आरंभ केला. सन २०१७ ते २०२२ पर्यंत त्यांनी पुणे येथे मेकअप सजावट करणार्या व्यावसायिकांसाठी प्रशिक्षण केंद्र व अभ्यासक्रम चालविला. त्यादरम्यान त्यांनी या व्यवसायात पदार्पण करू इच्छिणार्या अनेक तरुण-तरुणींना या क्षेत्रातील नवनवीन प्रकारांचे ज्ञानाने अवगत केले.
हेही वाचा >>> साडेतीन कोटींची दंडात्मक वसुली; पालघर जिल्ह्यात परवानगीशिवाय गौण खनिज वाहतूक
सिनेसृष्टीत वेगवेगळ्या स्पेशल इफेक्ट्स करण्यासाठी लागणारे कलाप्रकार व त्यासाठी लागणारे साहित्य त्यांनी विकसित केले असून हायपर रिअलिस्टिक थ्रीडी आर्ट फॉर्म ऑन पेपर या त्यांच्या प्रयोगाला लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये मानांकन मिळाली आहे. त्यांना डिसेंबर २०२२ मध्ये स्पेशल इफेक्ट व मेकअप इंडस्ट्रीमधील योगदानाबद्दल दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
लहानशा गावातून आंतरराष्ट्रीय व्यासपीठाकडे वाटचाल
३३ वर्षीय कृष्णा वाढेर यांचा जन्म पालघर या लहानशा गावात झाला. अनेक प्रतिकूल परिस्थितीचा सामना करताना आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाश झोतात येण्याच्या दृष्टीने त्यांनी लहानपणीपासून मनीषा बाळगली होती. पालघर येथे मोजक्या लोकांशी संपर्कात असलेल्या या तरुणीने दिवसात सुमारे १८ ते २० तास सातत्यपूर्ण मेहनत करून आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळविला आहे.
कला प्रकार नेमका काय आहे?
अनेक सीनेकृतींमध्ये व विशेषतः भयावह दृश्यांमध्ये विशिष्ट सजावटीच्या आधारे चेहेरा, हात व शरीराच्या इतर भागांवर देखावा तयार करण्यात येतो. यामध्ये वेगवेगळे मेकअप साहित्य वापरले जाते. मात्र प्रत्यक्षात असे सजावट करण्यापूर्वी त्याची कागदावर प्रतिकृती करणे म्हणजेच ‘हायपर रिअलिस्टिक थ्रीडी आर्ट फॉर्म ऑन पेपर’. विशिष्ट दर्जाच्या कागदावर मेकअप साहित्याद्वारे अशी चित्र त्या तयार करीत असून त्याच्या आधारे वेगवेगळे मेकअप प्रत्यक्षात तयार सोयीचे ठरत असते. आंतरराष्ट्रीय पातळीवर असे प्रयोग करणारी कृष्णा ही पाचवी व देशातील पहिलीच रंगकर्मी ठरली आहे.