पालघर : शासकीय अधिकाऱ्यांनी जनतेवर उपकार नव्हे तर कर्तव्याचा भाग म्हणून काम करायला हवे. प्रशासकीय यंत्रणेत काही अधिकाऱ्यांचे काम हे खटकणारे आहे, हे असंख्य तक्रारीवरून दिसून येते. अधिकाऱ्यांना जर प्रामाणिकपणे काम करायचे नसेल तर त्यांनी स्वयंखुशीने इतर जिल्ह्यात बदली करून घ्यावी, असे ठणकावून सांगत पालकमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबारात प्रशासकीय कामकाजावर नाराजी व्यक्त केली.
पालकमंत्री पदाच्या कारकिर्दीत गणेश नाईक यांनी प्रथमच पालघर येथे जनता दरबारचे आयोजन केले होते. सलग पाच तास सुरू राहिलेल्या या जनता दरबारात ७४१ निवेदन प्राप्त झाली व त्यापैकी ३६ निवेदन निकाली काढण्यात आल्याची माहिती देण्यात आली. येत्या १५ दिवसात संबंधित विभागांकडून उत्तर मागविण्यात येणार आहे. नंतर समस्यांचे उत्तर अर्जदारांना पाठवण्यात येणार असून विधिमंडळ अधिवेशन संपल्यानंतर सुमारे महिन्याभराच्या कालावधीने पुन्हा जनता दरबाराच्या आयोजन करून अर्जदारांची समाधान होईल याची दक्षता घेतली जाईल असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
सकाळी ११.४५ वाजता सुरू झालेला जनता दरबार सायंकाळी ४.४५ वाजेपर्यंत सुरू होता. त्यादरम्यान सर्वसामान्य नागरिकांपासून उद्योजक व्यापारी व इतर घटकाने आपल्या समस्या निवेदन रूपाने सादर केल्या. समस्या ऐकून संबंधित विभागाकडे वर्ग केल्या. काही समस्या तात्काळ अधिकारी वर्गाला समोर बोलून सोडवण्याचा प्रयत्न केला. अधिकारी वर्गाने कायद्याच्या चौकटीत राहून योग्य ती कारवाई करावी व ठोकळेबाज व परिपाठा प्रमाणे उत्तर देऊ नये, असे पालकमंत्री यांनी अधिकाºयांना बजावले.
जिल्ह्याचा विकास साधताना निधी संदर्भात आवश्यक बाबींची पूर्तता करण्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्य केले आहे. विकासासाठी अतिरिक्त मागण्या सादर करण्यात आले आहेत. विकासासाठी आवश्यकता भासल्यास विविध कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीमधून कामे केली जातील असेही गणेश नाईक यांनी सांगितले.
‘रिसॉर्ट मालक गुन्हेगार नाहीत’
जिल्ह्यात पर्यटनाला चालना देऊन रोजगार वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असताना रिसॉर्ट मालकांवर प्रशासन वेगळ्या दृष्टिकोनातून बघत असल्याचे दिसून आले आहे. रिसॉर्ट मालक हे गुन्हेगार नसल्याचे सांगत जिल्हाधिकारी, संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्यासोबत एकत्र बसून समस्या सोडविण्याचे पालकमंत्री यांनी सूचित केले. रिसॉर्टमध्ये अथवा जिल्ह्यात कुठे ही अंमली पदार्थांचे सेवन खपवून घेतले जाणार नाही, असे पालकमंत्री यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना ठणकावले.
पेसा भरती संदर्भात पाठपुरावा करू
पेसा भरती अंतर्गत शिक्षकांच्या भरतीसाठी तसेच त्यांच्या पगारासाठी ३४ कोटी रुपयांची मागणी पूर्ण करण्यासाठी आपण शिक्षणमंत्री तसेच अर्थमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. या प्रकरणात गरज भासल्यास केंद्रीय न्यायमंत्री यांच्याशी चर्चा करू असे सांगत पालकमंत्री गणेश नाईक यांनी पालघर जिल्ह्यातील पात्र शिक्षकांना नियुक्ती व्हावी या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना संबंधितांसोबत बैठक घेण्याचे सूचित केले.
‘अस्तित्व टिकवून विकास करा’
पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर तसेच रिलायन्सचा गारमेंट उद्योग उभा राहणार असून असे करताना स्थानिकांचे अस्तित्व कायम राहून विकास घडला पाहिजे, जीवनशैलीचा दर्जा उंचावला पाहिजे. प्रकल्प राबवताना स्थानिकांना विश्वासात घ्यावे. पालघर जिल्ह्यात विमानतळ, समृद्धी महामार्गाशी जोडणी तसेच नाट्यगृहासह अनेक राष्ट्रीय प्रकल्पांची उभारणी होत आहे. त्यामुळे पालघर जिल्हा आगामी काळात चौथी मुंबई होईल, असा विश्वाास पालकमंत्रांनी यावेळी व्यक्त केला.