पालघर: शासनाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना व्हावा याकरिता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या दशकपूर्ती व प्रथम सेवा हक्क दिनानिमित्त जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायती अंतर्गत आपले सेवा केंद्र उभारण्यात आले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या अंमलबजावणीची “दशकपूर्ती” आणि “प्रथम सेवा हक्क दिन” निमित्त पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली “सेवा हक्क दिन” साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी “सेवा हक्क शपथ” घेतली तसेच सेवा हक्क दिन उपक्रमास दहा वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल जिल्हा व तालुका पातळीवर विविध विशेष उपक्रम राबविण्याचा संकल्प केला. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी रणजित देसाई, तहसिलदार सचिन भालेराव, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी श्री. हसनाळकर यांच्यासह सर्व विभागाचे विभाग प्रमुख व पालघर जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र चालक उपस्थित होते.

या दिनाच्या औचित्य साधून आशागड ग्रामपंचायत (डहाणू), चहाडे ग्रामपंचायत (पालघर), पोमण ग्रामपंचायत (वसई), आमगाव ग्रामपंचायत (तलासरी), नेहरोली ग्रामपंचायत (वाडा) , चिंचघर ग्रामपंचायत (विक्रमगड), खडखड ग्रामपंचायत (जव्हार), सातुर्ली ग्रामपंचायत (मोखाडा) या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्राचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केला.

15 ऑगस्ट पर्यंत सर्व सेवा होणार ऑनलाइन

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत सध्या हजार पेक्षा जास्त सेवा या कायद्याच्या अंतर्गत अधिसूचित केल्या आहेत. जवळपास 583 सेवा ऑनलाईन दिलेल्या असुन 300 सेवा या अद्याप ऑनलाईन यायच्या आहेत. तसेच 125 सेवा ऑनलाईन असून देखील त्या कॉमन पोर्टलवर उपलब्ध नाहीत. त्यामुळे शासनाच्या सर्व विभागांना 15 ऑगस्ट पर्यंत सर्व सेवा ऑनलाईन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री यांनी केल्या आहेत.

नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या सुविधा

आपले सेवा केंद्रात नागरिकांना विविध सरकारी सेवा ऑनलाइन उपलब्ध आहेत. येथे नागरिक प्रमाणपत्रे, परवाने, आधार अपडेट, दाखले आणि इतर अनेक प्रकारच्या सेवांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया सोपी आणि जलद आहे, ज्यामुळे वेळेची बचत होते. तसेच या केंद्रातून अर्ज भरणे, आवश्यक कागदपत्रे सादर करणे, शुल्क भरणे आणि अर्जाची स्थिती तपासणे यांसारख्या सुविधा मिळतात.