कासा : पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात तसेच शहर परिसरात गावरान तसेच इतर जातीच्या कैऱ्या विक्रीसाठी शेतकरी, व्यापारी घेऊन येत आहेत. मात्र, ३०० ते ४०० रुपये शेकडा मिळणारी कैरी बाजारपेठेत ८० ते ९० रुपये किलो याप्रमाणे दुपटीच्या भावात विकली जात आहे. लोणच्यासाठी लागणाऱ्या कैरीची भाववाढ होऊनदेखील वर्षभर जेवणाची लज्जत वाढवणारे लोणचे बनवावेच लागते. भाववाढ होऊनही कैऱ्याची विक्री होत असल्याचे बाजारपेठेमध्ये दिसून येत आहेत.
मीठ, हळद लावून आवडीने कैरी खाणारेही पुष्कळ आहेत. कैऱ्या खाणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने मागणी वाढल्यामुळे शहरी भागातील बाजारपेठेसह ग्रामीण भागातील आठवडी बाजारात गावरान आंबे उपलब्ध होत आहेत सोबतच व्यापारी इतर राज्यातून कैऱ्या विक्रीसाठी मागवून घेतात. जिल्ह्यातील मोखाडा, जव्हार, विक्रमगड तालुक्यात मोठ्या प्रमाणात गावरान आंबे येतात. गावरान जातीमधील घोटळी, चिकाळा, राजापुरी या जातीला प्रतिकिलो ८० रुपये दर मिळत आहे. तर बाहेरून व्यापाऱ्यांनी आणलेल्या तोतापुरी, बारमाही आंबा या आंब्याना प्रतिकिलो ७० ते ९० रुपये दर मिळत आहे. ग्रामीण भागात काही ठिकाणी महिला ग्राहकांच्या आवडीनुसार लोणचे तयार सुद्धा करून देत असून त्याचा दर २८० ते ३०० रुपये किलोने विकले जात आहे.
एप्रिल- मे महिन्यापर्यंतच कैऱ्यांपासून खार (लोणचे) बनवण्याचा मुख्य हंगाम असतो. त्यामुळे या काळात शहरात व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कैऱ्या विक्रीस येतात. रस्त्याच्या कडेला दुकाने लावून कैऱ्यांची हातोहात विक्रीदेखील होते. पालघर परिसरात तसेच जव्हार, मोखाडा, विक्रमगड तालुक्यातून शहरात कैऱ्याचा पुरवठा केला जात आहे. परिसरातील ग्रामस्थ लोणच्यासाठी खासकरून गावरान जातीच्या आंब्याच्या कैऱ्या नेतात.
आकाराने मोठ्या व मध्यम असणाऱ्या या कैऱ्यांना कडक भाग कमी आणि मांसल भाग अधिकचा असतो, शिवाय त्याला चांगली आंबट चवही असते. त्यामुळे लोणचे घालण्यासाठी या कैऱ्यांचा सर्वाधिक वापर होतो. अगदी घरगुती वापरापासून ते विक्रीसाठीदेखील या कैऱ्यांचा वापर होतो.
प्रत्येक घराघरातील जेवणाची लज्जत कैरीचे लोणचे वाढवत आले आहे. लोणचे तयार करण्यासाठी जास्त प्रमाणात गावरान कैरीची मागणी असते. अनेक ठिकाणाहून कैऱ्या मागवून व्यापारी हकांची मागणी पूर्ण करतात. एप्रिल, मे, जूनमध्ये कैरीचे लोणचे घालण्याची पद्धत आहे.
लोणचे बनविताना आंब्याची निवड करताना महिलावर्ग साधारणपणे कच्चा, हिरवा, कडक आणि जाड सालीचा आंबा लोणच्यासाठी निवडतात. घट्ट मांस व आंबटपणामुळे राजापुरी आंबा, कमी आंबट व कमी गोडवा असलेला तोतापुरी आंबा, गोडवा असणारा केशर आंबा हा लोणच्यासाठी निवडला जातो. तसेच लोणच्याकरिता अनेक महिला तयार मसाल्यांच्या पाकिटाला पसंती देतात तर काही महिला बडीशेप, मेथी, मोहरीची डाळ, काळी मिरी, मीठ, हळद, लाल तिखट, हिंग व तेल वापरून घरच्या घरी लोणचे मसाले तयार करून लोणचे बनवतात. काही बचत गट महिलांनी यामध्ये पुढाकार घेतला असून इतर मसाल्यांसोबत ते लोणचे मसाले देखील बनवून विकत आहेत.