पालघर : सायबर गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता पोलीस दलाकडून विविध उपक्रम जिल्ह्यात सुरू आहेत. त्यादृष्टीने पोलीस दलाकडून तीन व चार चाकी रिक्षा, इमारती, चौक व इतर सार्वजनिक ठिकाणी सायबर सुरक्षित बाबतचे फलक लावून जनजागृती करण्यात येत आहे.
सायबर क्राईम, आर्थिक गुन्हयाचे प्रकार, अनधिकृत खोट्या कंपन्यांकडून देण्यात येणारी प्रलोभने व होणारी फसवणुक, ऑनलाईन नोकरी जाहिरात फसवणूक, ओएलएक्स, लैंगिक, केवायसी, डिजिटल अरेस्ट, क्रेडिट कार्ड फसवणूक यासारखे सायबर गुन्हे जिल्हासह इतर भागांमध्ये वारंवार घडताना दिसत आहे. याला वेळीच आळा बसण्यासाठी प्रशासनाकडून विविध प्रकारे जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे.
यामध्ये पालघर पोलीस दल अग्रेसर असून पोलीस दलाकडून सायबर सुरक्षित पालघर मोहिमेअंतर्गत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने जिल्ह्यात ऑटोरिक्षा तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी सायबर सुरक्षित बाबतचे जवळपास २०० हून अधिक फलक लावण्यात येत आहेत. याव्यतिरिक्त शाळा महाविद्यालयांना भेट देऊन सायबर सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन, गावभेट, ठीक ठिकाणी फलक, रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग दरम्यान गावातील नागरिकांना माहिती देणे यासह समाज माध्यम व प्रसारमाध्यमांद्वारे जनजागृती गेल्या अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गावांमध्ये व आपल्या आजूबाजूच्या परिसरात सायबर गुन्ह्याबाबत माहिती देण्यासाठी पालघर तालुक्यात १४७ सायबर योद्धे तयार करण्यात आले असून इच्छुकांनी सायबर योद्धे होण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन पालघर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
ऑनलाइन व्यवहारांपासून सावधान
सध्या मोठ्या प्रमाणात ऑनलाइन शॅापिंग, ऑनलाइन बँकिंगचे व्यवहार होतात. यासाठी स्मार्ट फोन, कॉम्प्युटर या माध्यमांचा वापर होतो. सर्व वयोगटातील नागरिक ई-प्रणालीचा वापर करतात. त्यामुळे खरेदी करताना ओटीपी व बँकेची माहिती देणे, ऑनलाइन पैसे भरणे अशा माध्यमातून फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे. मात्र ऑनलाइन खरेदी करताना हा वापर जबाबदारीपूर्वक होणे गरजेचे असल्याचे मत सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांनी व्यक्त केले.
जत्रेदरम्यान देखील जनजागृती
सातपाटी येथे श्रीराम नवमीपासून तीन दिवसीय जत्रा सुरू आहे. या जत्रेमध्ये येणाऱ्या नागरिकांना सायबर सुरक्षेच्या दृष्टीने जनसंवाद कार्यक्रम, डिजिटल व्हॅन, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, त्यामध्ये असणारे धोके, ऑनलाइन व्यवहार करताना घ्यायची काळजी अशा प्रकारचे फलक लावून सातपाटी पोलिसांकडून सायबर सुरक्षेच्या दृष्टीने माहिती देण्यात येत आहे.
अभियान राबवण्याचे उद्दिष्ट
सर्वसामान्य नागरिकांचा आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत ऑनलाइन व्यवहार पद्धतीकडे कल दिसून येतो. असे व्यवहार करताना अनेकांची फसवणूक झाल्याचे प्रकार देखील समोर आले आहेत. तसेच काही नागरिक जास्त पैसे मिळविण्याच्या किंवा कमविण्याच्या अमिषाला बळी पडतात आणि आपल्या बँक खात्याविषयीची सर्व गोपनीय माहितीची देवाणघेवाण करतात. याचाच फायदा घेत काही भामट्यांकडून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जाते. तसेच तरुण-तरुणी आपल्या खासगी आयुष्याची माहिती, छायाचित्रे समाजमाध्यमांवर टाकण्याच्या बाबतीत आहारी गेल्याचे दिसून येते. याच खासगी माहितीचा आणि छायाचित्रांचा गैरवापर करून त्यांच्याकडून काही समाजकंटक पैसे उकळतात. या प्रकारच्या गुन्ह्यांबाबत कुठे तक्रार करावी, सायबर गुन्हे शाखेशी कसा संपर्क साधावा तसेच सायबरक्राईम या संकेतस्थळाला भेट देणे याबाबत नागरिकांना माहिती व्हावी यासाठी हे सायबर गुन्हे जनजागृती अभियान राबविले जात आहे.
पोलीस दलाकडून सायबर गुन्हे रोखण्यासाठी विविध प्रयत्न होत आहेत. याकरिता नागरिकांनी देखील सहकार्य करणे आवश्यक आहे. सायबर फ्रॉड बाबत एखादाp प्रकार घडताना दिसल्यास 1930 या क्रमांकावर संपर्क साधावा.
अनंत पराड, पोलीस निरीक्षक पालघर