पालघर: पालघर येथील रिक्षा चालकाचा खून करून ओडिसा राज्यात वाहनासोबत पसार झालेल्या तीन आरोपींपैकी दोघांना पकडण्यास पालघर पोलिसांना यश लाभले असून संघ कार्यामुळे हा प्रतिष्ठेचा बनलेला गुन्हा उघडकीस आणण्यास शक्य आल्याचे प्रतिपादन पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी केले. याकामी ओडिसा पोलीस तसेच रेल्वे पोलिसांचे सहकार्य महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.
१२ ऑगस्ट रोजी सायंकाळी पालघर येथील आसिफ घाची याचा खून करून त्याला मोरचुंडी जवळ घाटात टाकून थेट ओडिसा गाठणाऱ्या तीन आरोपींनी पालघर मधील वास्तव्यापासून ओडिसा येथे पोहोचेपर्यंत आपल्या मोबाईलचा वापर केला नाही. किंबहुना त्यांनी आपले मोबाईल बंद ठेवले होते. तसेच फास्ट टॅग काढून गाडीच्या खालच्या भागात लपवून ठेवले होते. आरोपींची प्रथमदर्शनी कुठलीही माहिती उपलब्ध नसल्याने हा शोध घेणे आव्हानात्मक ठरले होते.
हेही वाचा >>>बनावट ‘लेटरहेड’द्वारे १० कोटींच्या कामाला मंजुरी; जिल्हा परिषद सदस्याला अटक
तरुण चालकाची हत्या झाल्याने पालघर मध्ये संवेदनशील वातावरण निर्माण झाले होते व या गुन्ह्याची उकल करणे पोलिसांसाठी प्रतिष्ठेचे ठरले होते. पालघर मधील विविध विभागात काम करणाऱ्या सुमारे ५० पोलिसांच्या सहा तुकड्या करून वेगवेगळ्या पद्धतीने तपास सुरू करण्यात आला होता. तर पालघर मध्ये स्थायिक असणाऱ्या इतर पोलीस सहकाऱ्यांनी गुन्हेगारांची माहिती संकलित करून त्यांचा निवासाचा पत्ता व ठाव ठिकाणा तपास पथकांपर्यंत योग्य वेळी पोहोचवल्याचे पोलीस अधीक्षक यांनी सांगितले.
हेही वाचा >>>वाहन चोरी, चालक खून प्रकरणी दोघांना अटक, पालघर पोलिसांची कारवाई
गाडीमध्ये असणारा फास्ट टॅग तसेच हत्या झालेल्या चालकाचा मोबाईल सुरू राहिल्याने गाडीचा ठाव ठिकाणा पोलिसांपर्यंत पोहोचला होता. गुन्हेगाराच्या एका नातेवाईकाचा बोईसरमध्ये संपर्क साधून गुन्हेगारांचे ओडिसा मधील निवासाचे ठिकाण पथकांपर्यंत पोहोचवण्यात आले. त्याचबरोबरीने पालघर पोलिसांनी तपासासाठी नेलेले वाहनांचे नंबरप्लेट बदलून हरियाणा व ओडीसा येथील गाड्यांमध्ये रूपांतरित केले होते. या मार्गावरील असलेले सीसीटीव्हीचे चित्रीकरण तपासत पुढे पोहोचलेल्या पोलिसांनी साध्या वेशात ओडिसा येथील कोकडमाल जंगलातून कालाहंडी पोलिसांच्या मदतीने आरोपीला अटक केली. तर तिकडून पसार झालेल्या एका अन्य आरोपीला नागपूर रेल्वे स्थानकात तांत्रिक तपासाच्या आधारे व रेल्वे पोलिसांच्या सहकार्याने पकडल्याची माहिती दिली.
हेही वाचा >>>गुन्हा नसताना सातपाटीचा तरुण चेन्नई पोलिसांच्या ताब्यात; बँक खात्यात सहा लाख ९० हजार बेनामी रक्कम जमा झाल्याचा आरोप
हे आरोपी ओडिसा मधील कालाहांडी जिल्ह्यातील दोन गावात वास्तव्य करत असून २० ते २५ वयोगटातील आहेत. यापैकी मुख्य सूत्रधार बोईसर येथे २० वर्ष तर इतर दोघे एक दोन वर्ष बोईसर येथील उद्योगात काम करत असल्याने पालघर येथून गाडी चोरून गावी ती भाड्याने लावण्याच्या प्रयोजनार्थ गुन्हा केल्याचे प्रथम दर्शनी चौकशीत आढळले आहे. दरम्यान वाहन चालकाला अलगद सोडल्यास त्याच्याकडून आपली माहिती पोलिसांपर्यंत पोहोचेल या उद्देशानेच त्याची हत्या केल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांनी पत्रकार परिषदेत दिली. मृताच्या नातेवाईकांनी पालघर पोलिसांना माहिती देण्यापूर्वी त्याची हत्या झाल्याची सांगत वाहन चालकाचे पोलीस प्राण वाचू शकले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
या नाट्यमय घडामोडींमध्ये पालघर पोलिसांनी एकसंघ भावना दाखवून केलेल्या कारवाईबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले असून या प्रकरणातील तिसऱ्या गुन्हेगाराचा शोध सुरू असल्याची माहिती दिली. अटक झालेल्या दोन गुन्हेगारांना पालघर न्यायालयाने २८ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असल्याचे सांगितले. या कामगिरीत सहभागी झालेल्या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले आहे.