पालघर : भारतीय रेल्वेने देशातील १२७५ पेक्षा अधिक रेल्वे स्थानकांची सुधारणा करण्यासाठी हाती घेतलेल्या अमृत भारत स्थानक सुधारणा योजनेमध्ये राज्यातील पालघर व नंदुरबार या दोन रेल्वे स्थानकांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पालघर रेल्वे स्थानकाचा आगामी काळात कायापालट होणार आहे.
अमृत भारत स्थानक योजनेत स्थानकावरील सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी विकास आराखडा तयार करणे आणि त्यांची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करणे समाविष्ट आहे. प्रत्येक स्थानकावरील गरज लक्षात घेऊन स्थानकावरील सुविधा सुधारणे, प्रवाशांकरिता मोकळे क्षेत्र, प्रतीक्षा गृह (वेटिंग हॉल), शौचालये, आवश्यकतेनुसार उद्वाहन, सरकते जिने, रेल्वे स्थानकाच्या स्वच्छतेचा स्तर उंचावणे, मोफत वाय-फाय, स्थानिक उत्पादनांसाठी ‘एक स्थानक एक उत्पादन’च्या विक्रीसाठी दालने, उत्तम प्रवासी माहिती प्रणाली, सुखसोयीनी सुसज्ज विश्रामगृह, व्यवसाय बैठकीसाठी नामांकित स्वतंत्र जागा, बागबगीचे व सुशोभीकरण लँडस्केपिंग आदी सुविधांचा या योजनेत समावेश आहे.
तसेच या योजनेत इमारतीतील सुधारणा, शहराच्या दोन्ही बाजूंनी स्थानकाचे एकत्रीकरण, मल्टिमॉडल इंटिग्रेशन, अपंगांसाठी सुविधा, शाश्वत आणि पर्यावरणपूरक उपाय, बॅलेस्टलेस ट्रॅक, आवश्यकतेनुसार ‘रूफ प्लाझा’, दीर्घकालीन शहर केंद्रेची निर्मिती आदी सुविधाही अंतर्भूत आहे. १२७५ रेल्वे स्थानकांच्या पहिल्या यादीत राज्यातील १२३ रेल्वे स्थानकांत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई सेंट्रल, बांद्रा टर्मिनस, दादर, बोरिवली, अंधेरी, ठाणे, कल्याण आदींचा समावेश आहे.