पालघर : सप्टेंबर २०२४ मध्ये रोठे (केळवे रॊड) येथील भुयारी मार्गाची दुरुस्ती पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवणाऱ्या डीएफसीसी ने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भुयारी मार्गावर नव्याने काँक्रीटकरणाचे काम हाती घेतले आहे. मुळात या भुयारी मार्गातून दोन मोठ्या वाहनांना आमने-सामने प्रवास करणे कठीण होत असताना या दुरुस्ती कामामुळे पुढील दीड-दोन महिने वाहन चालकांसाठी हा मार्ग डोकेदुखी ठरणार आहे.
केळवे रोड व सफाळ्या दरम्यान असणाऱ्या रेल्वे फाटक ४ जून २०२४ मध्ये बंद करण्यात आले होते. तत्पूर्वी सुरू केलेल्या भुयारी मार्गाला वेगवेगळ्या ठिकाणी तळा गेल्याने तसेच भुयारी मार्गाच्या बांधकामाचा दर्जा सुमार असल्याने जमिनीमधून पाण्याचा शिरकाव होऊन पावसाळ्यात हा भुयारी मार्ग पाण्याने व चिखलाने भरून जात असे.
ही बाब स्थानिकानी डीएफसीसी तसेच जिल्हा प्रशासनाला कळवल्यानंतर २५ जून २०२४ रोजी यासमस्ये संदर्भात जिल्हाधिकारी यांनी बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी गळती होणारी सर्व ठिकाणे बंद करणे तसेच भुयारी मार्गाचे मजबुतीकरणाचे काम सप्टेंबर २०२४ पूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. भुयारी मार्गाच्या दुरुस्ती व मजबुती करण्याचे काम सप्टेंबर महिन्यात पूर्ण झाल्याचे फलक देखील मार्गाच्या एकाच बाजूने लावण्यात आले होते.
रोठे, डोंगरी, खरसुंडी, मोहाळे या गावातील सुमारे ५००० नागरी या भुयारी मार्गाचा वापर करीत असून प्रत्यक्षात रेल्वेलाईन असणाऱ्या ठिकाणी भुयारी मार्ग अरुंद असल्याने दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यास त्या ठिकाणाहून पुढे जाण्यास अडचण निर्माण होत असते. अशा परिस्थितीत भुयारी मार्गाच्या अर्ध्या भागावर काँक्रिटीकरण करण्याचे काम एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे एकावेळी एकाच दिशेने एकच वाहन जाऊ शकेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
केळवे रोड पूर्व पश्चिम प्रवास करण्यासाठी हा एकमेव जवळचा मार्ग असून या ठिकाणाहून गवताच्या गाड्या, आरएमसी वाहून नेणारी मोठी वाहने तसेच गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ असते. अशा परिस्थितीत दुरुस्तीचे काम पुढील महिना दीड महिना सुरू राहणार असल्याने या अवजड वाहनांना तसेच इतर लहान वाहन चालकांना गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे.
सफाळेकडे जाणाऱ्या रस्त्याला जोडणी नाही
समर्पित मालवाहू रेल्वे मार्गाचे काम सुरू असताना रोठे ते सफाळा (कपासे पूल) दरम्यान एक कच्चा रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र पुलाची उभारणी केल्यानंतर खाजगी जागेतून हा रस्ता जात असल्याने रोठे ते कपासे पुलादरम्यान जोडणी अपूर्ण राहिली होती. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक पूर्ववत होऊ शकली नव्हती.
पावसाळ्याची समस्या
रोठे येथील भुयारी मार्गावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने या मार्गाचा अवलंब करता येत नाही. त्यामुळे रोठे येथे उड्डाणपुलाची मागणी प्रलंबित असून जिल्हा प्रशासनाने याबाबत लक्ष घालावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
रोठे येथे भुयारी पुलाची उभारणी केल्यानंतर त्याच्या तळाला तडा गेल्या होत्या. या तळामधून तसेच भुयारी मार्गाच्या भिंतीमधून पाणी झिरपत असल्याने भुयारी मार्ग पावसाळ्यात वापरणे शक्य होत नाही. या भुयारी मार्गाची दुरुस्ती हाती घेतली असली तरीही परिसरात पडणाऱ्या पावसाचा अभ्यास करता या भागात उड्डाणपुलाची उभारणी करणे आवश्यक आहे. – मधुसूदन जोशी, रहिवासी, रोठे, भुयारी मार्गाच्या दुरुस्तीचे छायाचित्र