करोनाची पार्श्वभूमी तसेच निधीचा अभाव; पावसाळ्यात वाहतूक बंद होण्याची शक्यता

पालघर: पालघर- बोईसर रस्त्याला जवळचा पर्यायी रस्ता म्हणून ओळखला जाणाऱ्या कोकणेर- गुंदले रस्त्याचे काम करोना पार्श्वभूमीवर तसेच निधीअभावी रखडले आल्यामुळे मुसळधार पाऊस झाल्यास या मार्गावरील वाहतूक बंद होण्याची यंदाच्या पावसाळ्यात शक्यता कायम राहिली आहे.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत या रस्त्याचे रुंदीकरण मजबुतीकरणाचे काम दोन वर्षांपूर्वी हाती घेण्यात आले होते. सुमारे साडेदहा किलोमीटर लांबीच्या या रस्त्याच्या कामासाठी नऊ कोटी ४४ लाख रुपयांचा खर्च मंजूर झाला आहे. मात्र करोना टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर तसेच ठेकेदाराने यापूर्वी केलेल्या कामाचा मोबदला दिला न गेल्याने तसेच निधीअभावी या रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकले नसल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सद्यस्थितीत कोकणेर राईपाडय़ा जवळ एका पुलाचे काम हाती घेण्यात आले असून या आठवडाअखेरीस या पुलावर स्लॅब टाकण्यात येईल असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. तरी देखील एक खोलगट भागात पुलाची उभारणी तसेच अन्य काही मोऱ्यांची काम प्रलंबित राहिल्याने मुसळधार पाऊस झाल्यास या मार्गावरील वाहतूक खंडित होण्याची परंपरा यंदाच्या वर्षीदेखील कायम राहणार आहे.

पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी पर्यायी रस्त्याची उभारणी करण्यात आली असून गेल्या पावसाळ्यात ज्या ठिकाणी रस्ता दबला होता अशा ठिकाणी दुरुस्ती करण्यात आल्याचे पंतप्रधान ग्राम सडक योजना विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर ठेकेदाराला पुढील पाच वर्ष या रस्त्याची देखभाल- दुरुस्ती करावयाची असल्याचेदेखील सांगण्यात आले.