पालघर : पालघर जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व सदस्यांचा तामिळनाडू अभ्यास दौरा वादात सापडला आहे. सदस्यांचा कार्यकाळ दोन महिन्यांनी संपणार असताना १२ लाख रुपयांचा हा अभ्यास दौरा कशासाठी आणि याचे फलित काय, असा प्रश्न उपस्थित झाला असून हा दौरा म्हणजे करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
तामिळनाडू राज्यातील मत्स्य, शेती, डोंगराळ भागातील शेती, शैक्षणिक ज्ञानासाठी भेट, पर्यटन स्थळांना भेट, नारळ लागवड व मिळणारे उत्पन्न याबाबत १८ ते २३ डिसेंबर दरम्यान जिल्हा परिषद सदस्यांच्या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. याकरिता जिल्हा परिषद सेस फंडातून १२ लाख रुपयांची एकत्रित तरतूद सामान्य प्रशासन विभागाकडून करण्यात आली होती. या दौऱ्यात जिल्हा परिषदेचे ५७ व आठ पंचायत समिती सभापती अशा एकूण ६५ सदस्यांपैकी ५० सदस्यांनी प्रशिक्षण दौऱ्यात सहभागी झाले होते. मात्र जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ १७ फेब्रुवारी २०२५ रोजी संपुष्टात येत असल्याने या अभ्यास दौऱ्यात मिळालेल्या माहितीचा वापर कसा व कुठे करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
विद्यमान पदाधिकारी व सदस्यांच्या उर्वरित कार्यकाळात सर्वसाधारण सभेचे आयोजन शक्य नाही. मात्र काही योजनांची व कामांच्या मंजुरीसाठी स्थगित करण्यात आलेल्या निविदा प्रकियेवर निर्णय घेण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत अभ्यास दौऱ्यात अवगत केलेल्या ज्ञानाचा वापर विकास कामाच्या नियोजनात कसा व कधी होणार याबद्दल प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत.
मुंबई तसेच राज्यात शीतगृह, मत्सवस्थापन केंद्र, शेती व्यवस्थापन व संशोधन केंद्र अनेक ठिकाणी अधिक प्रमाणात विकसित असताना यासाठी तामिळनाडूत अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्याची गरज का निर्माण झाली त्याबद्दल जिल्हा परिषद प्रशासन समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. भातशेती, शाळा, मासळी बाजार व नारळ उत्पादनांची ओझरती पाहणी करून सदस्यांना काय शिकायला मिळले याबद्दल देखील चर्चा सुरू आहे.
आधींचे अभ्यास दौऱ्यांबाबतही साशंकता
करोना काळानंतर जिल्हा परिषदेने सन २०२२-२३ या वित्तीय वर्षात कुलुमनाली, पंजाब असा दौरा आयोजित केला होता तर सन २०२३-२४ या वर्षात केरळ राज्यात अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही दौऱ्याला प्रत्येकी १२ लाख रुपये जिल्हा परिषद कार्यालयाकडून देण्यात आले होते. उर्वरित खर्च हा जिल्हा परिषद सभापती व सदस्य यांच्यामार्फत करण्यात आल्याचे स्पष्टीकरण जिल्हा परिषदतर्फे देण्यात आले. मात्र या दौऱ्याबाबत जिल्हा परिषदेच्या यापूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत पाहणी केलेल्या ठिकाणांचा संदर्भ घेऊन नव्याने प्रस्ताव मांडल्याचे दिसून आले नाही. सभेदरम्यान वादविवाद, अध्यक्षांना संबोधित न करता इतर सदस्यांवर आरोप, खुर्चीवर बसून प्रश्न विचारणे व इतर बेशिस्तपणाचे वर्तनच दिसून आले. हे पाहता जिल्हा परिषदेच्या यापूर्वी आयोजित केलेल्या अभ्यास दौऱ्यातून सदस्यांनी शिस्तप्रियता अवलंबून नसल्याचे दिसून आले, असे म्हटले जाते.
दौऱ्यासाठी खासगी संस्थेचा आधार
एकीकडे जिल्हा परिषदेमधील निविदांचे वित्त विभागाकडून एकत्रिकरण करून निधीचे सुनियोजन करण्यासाठी झालेल्या प्रयत्नांविषयी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रमुख सदस्यांनी समाचार घेतला होता. या अभ्यास दौऱ्याचे नियोजन करताना शासकीय संस्था अथवा तत्सम संस्थेकडून आयोजन करण्याऐवजी खाजगी टूर चालकाकडून दौऱ्याचे आयोजन झाल्याचे दिसून आले आहे.
हेही वाचा – रेल्वे प्रवाशांचे पुन्हा हाल! मुंबई- वलसाड डबलडेकरचा प्रवास लवकरच थांबणार
सेस फंडामध्ये वृद्धीची घोषणा हवेत
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रकाश निकम यांनी जिल्हा परिषदेचा सेसफंड (उत्पन्न) वाढवण्यासाठी आपण नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न करू अशी घोषणा केली होती. नव्याने उत्पन्नाच्या माध्यमातून सेस फंडामध्ये विशेष वृद्धी झाली नसली तरीही या फंडातून अभ्यास दौऱ्यांचे आयोजन करून खर्च होत असल्याचे म्हटले जात आहे.
सेल्फी आणि स्टेटसमुळे टीका
या अभ्यास दौऱ्यादरम्यान मदुराई येथील मीनाक्षी मंदिर दर्शन, मदुराई सिल्क साड्या खरेदी, धनुष्यकोडी रामसेतू, विभीषण मंदिर, रामेश्वरम दर्शन, कोडाईकनाल अशा ठिकाणांना भेटी आयोजित करण्यात आल्या होत्या. पर्यटन दृष्टिकोनातून अभ्यासाच्या हेतूने अशा ठिकाणी सदस्याने काढलेले छायाचित्र व सेल्फी त्यांच्या समाजमाध्यमांवर झळकल्यामुळे अभ्यास दौरा वादात सापडला आहे.
दरवर्षी जिल्हा परिषद पालघर अंतर्गत कृषी, पशुसंवर्धन, शिक्षण, आरोग्य, बांधकाम, वित्त पाणीपुरवठा समाज कल्याण इत्यादी समितीच्या एकत्रित अभ्यास दौरा हा सामान्य प्रशासन विभागातर्फे करण्यात येत असतो. असे अभ्यास दौरा शासनाच्या धोरणात्मक दृष्ट्यांच्या अनुषंगाने इतर लोकप्रतिनिधी व सनदी अधिकारी दरवर्षी करीत असतात. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद पालघरने दरवर्षी एक अभ्यास दौरा करण्याचे योजिले होते. – प्रकाश निकम, अध्यक्ष जिल्हा परिषद