डहाणू तालुक्यातील रानशेत येथील आश्रमशाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने रविवार १ सप्टेंबर रोजी आश्रमशाळेतील स्वच्छतागृहात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गळफास घेतल्यानंतर बेशुद्ध अवस्थेत असताना काही विद्यार्थिनींच्या सतर्कतेमुळे विद्यार्थिनीचा जीव वाचला असून सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रानशेत आश्रमशाळेत १० वी इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने रविवारी सकाळच्या सुमारास ओढणीच्या साहाय्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थिनी स्वच्छतागृहात गेल्यानंतर बराच वेळ बाहेर येत नसल्याचे दुसऱ्या विद्यार्थिनीने तिला हाक मारून बाहेर बोलावण्याचा प्रयत्न केला. मात्र तरी विद्यार्थिनी बाहेर येत नसल्याने दुसऱ्या विद्यार्थिनीने खिडकीतून पाहण्याचा प्रयत्न केला असता विद्यार्थिनी ओढणीच्या साहाय्याने गळफास घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे विद्यार्थिनीच्या लक्षात आले. तिने याविषयी कर्मचारी आणि शिक्षक वृंदला याची माहिती दिल्यानंतर उपस्थित स्वच्छता कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनीला खाली उतरवले असता ती बेशुद्ध अवस्थेत असल्याचे लक्षात आले. कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवले असून येथे प्राथमिक उपचार करून प्रकृती गंभीर असल्यामुळे तिला पुढे सेलवास येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी खेद व्यक्त करताना म्हणाले…

हेही वाचा – पुणे : डॉक्टर महिलेचा विनयभंग करणाऱ्या दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा

विद्यार्थिनीच्या आत्महत्येच्या प्रयत्नामागचे नेमके कारण अजून अस्पष्ट आहे. मात्र या घटनेमुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. शिवाय घरापासून लांब आश्रमशाळेत राहणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळोवेळी समुपदेशन करून त्याच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होत आहे.