पालघर: शाळा व महाविद्यालयांच्या परीक्षा संपल्याने इतर ठिकाणी प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांना लागणाऱ्या कागदपत्रांकरिता विद्यार्थ्यांची व पालकांची गैरसोय होऊ नये या दृष्टीने नांदगाव तर्फे तारापूर ग्रामपंचायतीने सेवा केंद्र रात्री दहा वाजेपर्यंत कार्यरत ठेवले आहे.

पालघर तालुक्यातील नांदगांव तर्फे तारापूर ग्रामपंचायतीने शासकीय योजना व महसूल सेवा पुरवण्यात उल्लेखनीय कामगिरी करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ग्रामपंचायतीच्या या पुढाकारामुळे स्थानिक ग्रामस्थांना घरच्या घरी व सहज उपलब्ध सेवा मिळत असून नागरिकांच्या समाधानाची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

अनेक घरातील पालक सकाळी लवकर कामावर निघून जात असल्याने सायंकाळी उशिरा घरी येतात अशा पालकांना कागदपत्रे जमा करताना विलंब होतो. तर काही वेळा सुट्टी घेऊन कागदपत्रांकरिता ग्रामपंचायत, नगरपरिषदेत हेलपाटे घ्यावे लागतात. यादृष्टीने नांदगाव तर्फे तारापूर ग्रामपंचायतीने विविध दाखले व योजनांचे अर्ज भरण्याकरिता रात्री दहा वाजेपर्यंत सेवा केंद्र सुरू ठेवले आहे. त्यामुळे या सेवेचा लाभ येथील ग्रामस्थांना मिळत आहे.

या उपक्रमात ग्रामस्थ ॲड. विद्युत मोरे यांचे योगदान महत्वाचे असून ते दररोज सायंकाळी विनामूल्य सेवा देत ग्रामस्थांना मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या या सेवाभावी कार्यामुळे अनेकांना योजनांची माहिती मिळून प्रत्यक्ष लाभ घेता आला आहे. ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे तालुक्यातील इतर गावांमध्ये या कार्यपद्धतीचा आदर्श घेऊन इतर पंचायतींनीही असेच उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी व योजनांची पुरेशी माहिती नसल्याने अनेक वेळा सायबर कॅफेमध्ये जाऊन अर्ज भरावा लागतो. याकरिता 200 व त्याहून अधिक रुपयांचा शुल्क भरावा लागतो. मात्र ग्रामपंचायतीने विनामूल्य सुरू केलेल्या या उपक्रमामुळे आम्हाला त्याचा लाभ होत असल्याचा दिलासा विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.

या दाखल्यांचा समावेश

ग्रामपंचायत कार्यालयातून आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आरोग्य कार्ड, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, पीक विमा योजना, लाडकी बहीण योजना, तसेच मतदार नोंदणी अशा अनेक शासकीय योजनांचा लाभ देण्यात येतो. याशिवाय उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, रहिवाशी दाखला यांसारखे विविध महसूल दाखले सुद्धा त्वरित मिळतात.

राज्य सरकारच्या व केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचाव्या, त्यांना या योजनांचा लाभ मिळावा व त्यांना आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता व्हावी या दृष्टीने एड. विद्युत मोरे यांच्या सहकार्याने हे कार्यालय रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थांच्या सेवेकरिता सुरू असते.- समीर मोरे, सरपंच, नांदगाव तर्फे तारापूर ग्रामपंचायत