पालघर : पालघर येथील सना अन्सारी (२२) या महिलेने ४१७ दिवसात ७५०० किलोमीटर अंतर पायी प्रवास करून १८ एप्रिल रोजी मक्का गाठले. १८ एप्रिल रोजी दुपारी सना व तिच्या पतीने आपल्या प्रवासाची सांगता केली. आठ वेगवेगळ्या देशांमधून प्रवास करताना त्या ठिकाणी बदलणारे हवामान, खाणे, पाणी अशा अनेक आव्हानांना सामोरे जात केलेली ही कामगिरी धाडसी ठरली आहे.
सना हिने ११ वी व १२ वी पर्यंतचे शिक्षण पालघर येथील महाविद्यालयातून घेतले. त्यानंतर सनाने बांधकाम व्यवसायिक असणाऱ्या अझीम शेख यांच्याशी विवाह केला. तिने पतीसोबत मक्का चालत गाठण्याचा निश्चय केला. त्या दृष्टीने आवश्यक सर्व व कागदोपत्री पूर्तता केल्यानंतर २७ फेब्रुवारी २०२४ रोजी पालघर (टेंभोडे) येथून सुरू केला. गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा मार्गे अमृतसरपर्यंत ती चालत गेली. अमृतसर ते इराण पर्यंत तिने हवाई मार्गाने जाण्याचे योजिले. त्यानंतर इराण पासून इराकच्या सीमेपर्यंत पायी गेली. त्यानंतर इराक सीमेपासून दुबई पर्यंत जलमार्गाने प्रवास केला. दुबईपासून अल-भाटा, सौदी अरेबिया, रियाद आणि मदिना अशा प्रदेशातून पायी प्रवास करत हे जोडपे मक्का येथे शुक्रवारी (ता. १८) दाखल झाले.
एक वर्ष एक महिना व २३ दिवस असा वेगवेगळ्या प्रदेशातून प्रवास करताना त्यांना अति उष्णता, थंड हवामान, पाऊस, कोरडी हवा अशा विविध परिस्थितीला सामोरे जावे लागले. त्यांनी दररोज ३० किलोमीटर अंतर गाठण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. सकाळी व सायंकाळी प्रत्येकी तीन तास असे सुमारे सहा – सात तासाचा प्रवास करून त्यांनी हॉटेलमध्ये आसरा घेतला. बदलत्या हवामानामुळे त्या चार-पाच वेळा आजारी झाल्या. मात्र औषधोपचाराने बरे वाटल्यानंतर मनाशी केलेला निश्चय पूर्तता करण्यासाठी त्यांनी आपला प्रवास निरंतर सुरू ठेवला. दैनंदिन गरजेच्या मोजक्या वस्तू घेऊन प्रवास करताना सर्वत्र त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. आपल्या पतीच्या पाठबळामुळे तसेच या मार्गात अनेकांनी दिलेल्या प्रोत्साहन व सहकार्यामुळे आपण मका पर्यंतचा पल्ला गाठू शकलो असे त्यांनी सांगितले.
सहा बुटांचे जोड
सुमारे ७५०० किलोमीटर अंतर चालताना दररोज ३० किलोमीटर अंतर पार पडण्याचे उद्दिष्ट ठेवून या जोडप्याने प्रवास केला. या काळात त्यांना गुजरात राज्य पासून पुढे देशात सर्वत्र स्वागत करून तिच्यासोबत काही अंतर चालण्यासाठी अनेक नागरिक सोबत करीत असत. मर्यादित सामानामुळे त्यांना वाहनांची आवश्यकता भासली नाही. मात्र ५९ आठवडे प्रवास केल्याने त्यांना सहा बुटांची जोड वापरावे लागले. या प्रवासादरम्यान त्यांनी किरकोळ स्वरूपाचे औषध व पाय दुखण्यासाठी मलम व इतर वस्तू सोबत ठेवल्या होत्या.
४१७ दिवसांचा चालत प्रवास करून मक्का गाठण्याचा आनंद वेगळा आहे. माझ्या पती व कुटुंबीयांची साथ तसेच वाटेमध्ये मिळालेल्या सहकार्यामुळे हे सहज शक्य झाले. या प्रवासादरम्यान वेगवेगळ्या प्रांतातील नागरिकांनी मला प्रोत्साहन दिले, स्वागत व सहकार्य केले.
सना अन्सारी