पालघर: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त घरोघरी तिरंगा हा उपक्रम जिल्ह्यामध्ये उत्साहपूर्ण वातावरणात राबविण्यात येत असून जिल्ह्यातील प्रत्येक घरावर तिरंगा लावण्यासाठी सुमारे सडेसहा लाख तिरंगा ध्वज वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील नियोजनबद्ध विकासामुळे पालघर जिल्हा प्रगतिशील जिल्हा म्हणून ओळख निर्माण करेल, असा विश्वास जिल्हाधिकारी गोिवद बोडके यांनी व्यक्त केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी सोहळय़ानिमित्त जिल्हाधिकारी गोिवद बोडके यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हा मुख्यालय संकुलात पार पडले.  यावेळी पालघर जिल्हा परिषद अध्यक्षा वैदेही वाढाण, खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे, पालघरच्या नगराध्यक्ष डॉ. उज्ज्वला काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी सिध्दाराम सालिमठ, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, संदीप पवार, सुरेंद्र नवले, तसेच जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी, शालेय विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची पालघर जिल्ह्यात १०० टक्के अंमलबजावणी करण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. याअंतर्गत २१ हजार ६५२  लाभार्थीचे अर्ज मंजूर करण्यात आले असून १७ हजार २०४ लाभार्थीना लाभ देण्यात आलेला आहे. मोफत संगणकीय सातबारा वाटप कार्यक्रमांतर्गत जवळपास दोन लाख सातबारा उताऱ्यांचे वाटप करण्यात आले आहेत.

महसूल दिनादिवशी ई-पीक पाहणी मोबाइल अ‍ॅपचा शुभारंभ करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना या मोबाइल अ‍ॅप अंतर्गत पिकांची नोंद करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी  बोडके यांनी केले.

जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सन २०२२-२३ मध्ये ७०५ कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आला असुन, त्यामध्ये ३७५  नवीन व २०५ रेट्रोफिटिंग अशा एकूण ५८० योजनांचा समावेश आहे. या आराखडयातील ४८९  योजनांना तांत्रिक मान्यता देण्यात आली असून ३२० योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, तर ११०  योजनांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.

आरोग्य विभागामार्फत मनोर येथील ट्रॉमा केअर युनिट व २०० खाटांचे अत्याधुनिक रुग्णालयाचे बांधकाम सुरू असून या आधुनिक रुग्णालयाचे बांधकाम ६० टक्के पूर्ण झाले आहे. पालघर जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना मिळण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, तारापूर यांच्यामार्फत किनारपट्टीवरील नागरी घनकचरा साफसफाईसाठी अद्यावत स्वरूपाची मशिनरी केळवे ग्रामपंचायत यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत सूक्ष्म व लघु उपक्रमांना चालना देण्यासाठी तसेच व्यापक प्रमाणात रोजगाराच्या संधी स्थानिक ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार असून जिल्ह्यातील इच्छुक लाभार्थीनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.

जिल्ह्यामध्ये केंद्र शासनामार्फत मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प, मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्ग, समर्पित मालवाहू रेल्वे मार्गिका प्रकल्प, विरार-डहाणू रेल्वमार्ग चौपदरीकरण यासारखे महत्त्वाचे प्रकल्प उभारणीचे काम सुरू असून या प्रकल्पांमुळे दळणवळणाची साधने उपलब्ध होऊन जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार आहे.  सामान्य माणूस हा केंद्रिबदू मानून विकासाचे नियोजन करण्यात आले असून शाश्वत व नियोजनबद्ध पद्धतीने विकास सुरू असल्याचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सांगितले.

गाव नमुने संगणकीकृत

ई-चावडी प्रकल्पांतर्गत तलाठी दप्तराचे (सर्व गाव नमुने) संगणकीकृत करून जमीन महसुलासह सर्व देय शासकीय कर व उपकर निश्चित करून ते ऑनलाइन भरण्याची सुविधा खातेदार नागरिकांना उपलब्ध करून दिली जाणार असून या प्रणालीचे पूर्वतयारीकरिता पालघर जिल्ह्यातील आठ गावांची निवड करण्यात आली असल्याची माहिती  त्यांनी दिली.

वनहक्के दावे मंजुरीत जिल्हा राज्यात प्रथम

वनहक्क कायद्यान्वये जिल्ह्यामध्ये ४९ हजार ५१८ वैयक्तिक व ४४६ सामूहिक वनहक्क दावे मंजूर करण्यात आलेले आहेत. राज्यामध्ये पालघर जिल्ह्यात सर्वात जास्त वैयक्तिक वनहक्क दावे मंजूर करण्यात पालघर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक लागतो, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

८९ अमृत सरोवर

अमृत सरोवर योजनेंतर्गत स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षांत प्रत्येक जिल्हयात किमान ७५ अमृत सरोवर निर्माण करण्याचा शासनाचा मानस आहे. त्या अनुषंगाने पालघर जिल्हयात ८९ अमृत सरोवर निश्चित करण्यात आले असून, ४१ अमृत सरोवर कामास सुरुवात झाली आहे. १९ अमृत सरोवरांचे काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Palghar will be progressive district collector at independence day amrit mahotsav celebration zws