पालघर : तारापूर येथे भाभा अनुसंशोधन केंद्राच्या (बीएआरसी) आवारात नव्याने उभारण्यात येणाऱ्या इंटिग्रेटेड न्यूक्लिअर रिसायकल प्लांट (आयएनआरपी) च्या आवारामध्ये दोन कामगारांमध्ये झालेल्या वादामध्ये एका स्थानिक आदिवासी कंत्राटी कामगारावर आज दुपारी खुनी हल्ला करण्यात आला आहे. या प्रकारात गंभीर जखमी कामगाराला तारापूर औद्योगिक वसाहती मधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आहे.

प्रेशराईज हेवी वॉटर रिअॅक्टर मधून वापरलेल्या इंधनातील उपयुक्त घटकांचा पुनर्वापर करण्याच्या दृष्टीने बीएआरसी च्या आवारात या आयएनआरपी प्लांटची उभारणी काही वर्षांपासून सुरू असून त्याचे काम काही ठेकेदारांना देण्यात आले आहे. एका उपठेक्यात काम करणाऱ्या या दोन कामगारांमध्ये हा वादावादीचा प्रकार घडला.

हेही वाचा…माझा रोख मुख्यमंत्र्यांकडे नाही- गणेश नाईक

केंद्राच्या उभारणीचे अंशतः काम पाहणाऱ्या एल अँड टी कंपनीच्या ठेक्यात काम करणाऱ्या दोन कामगारांमध्ये बॅचिंग प्लांट जवळ असणाऱ्या कामगारांच्या विश्राम करण्यासाठी असणाऱ्या कंटेनर केबिनमध्ये दोन कामगारांमध्ये वाद झाला. दुपारी ११.३० ते १२ वाजल्याच्या दरम्यान किसन विजय गुंजाळ (राहणार कल्याण ) (२५)यांनी पालघर जिल्ह्यातील मूळ रहिवासी रुपेश बाबू वावरे (२३) यांच्या छातीमध्ये भाजी कापण्याच्या सुरीसारख्या तीक्ष्ण हत्याराने वार केला. गंभीर अवस्थेमध्ये या कामगाराला बोईसर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या जखमी कामगाराच्या वैद्यकीय तपासणीच्या प्राथमिक निदानामध्ये हृदय, फुफ्फुस व इतर महत्त्वाच्या अवयवांना इजा पोहोचली नसली तरीही त्याची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

दरम्यान हे दोन्ही कामगार मिक्सर वाहनांवर चालक असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली असून पोलिसांनी वार करणाऱ्या विनय गुंजाळ याला ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती तारापूर पोलीस स्टेशन प्रभारी पोलीस अधिकारी सागर कावळे यांनी लोकसत्ता ला दिली. या घटनेच्या अनुषंगाने तारापूर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

हेही वाचा…पालघर: सफाळेतील जेटीचा मार्ग मोकळा, वन विभागाची जागा सागरी मंडळाकडे वर्ग करण्यास सरकारची परवानगी

राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रकल्पाच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह

तारापूर बीएआरसी मध्ये घडलेली घटना ही तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या १.६ किलोमीटरच्या अपवर्जत क्षेत्र (एक्सक्लूजन झोन) मध्ये घडली आहे. विशेष म्हणजे या क्षेत्रामध्ये प्रवेश करताना कामगार व वाहनांची कसून तपासणी केली जाते. आयएनआरपी प्लांट ची उभारणी सुरू असल्याने त्या ठिकाणी मुख्य प्रवेश द्वारावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) तैनात असून नव्याने उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या ठिकाणी देखील सीआयएसएफ सुरक्षा यंत्रणा कार्यरत आहे. असे असले तरी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या ताब्यात असणाऱ्या मुख्य प्रवेशद्वारावरून धारदार चाकूप्रमाणे वस्तू घेऊन जाण्यास यश मिळवल्याने देशासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या या केंद्राच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.