पालघर : जिल्हा परिषदे तर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या सरस कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मध्यरात्रीनंतर ध्वनीक्षेपक मोठ्या आवाजात सुरू असल्याने कार्यक्रम थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांसोबत जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व सदस्यांसोबत वाद झाला.

जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम गुरुवार (३० जानेवारी) रोजी सायंकाळी सहा वाजता सुरू होणार होते. मात्र प्रत्यक्षात हे कार्यक्रम सुरू होण्यास रात्रीचे ७३०-८ वाजले. जिल्हा परिषदेचे बहुतांश अधिकारी व कर्मचारी रात्री ११ वाजेपर्यंत आपापल्या घरी परतले. जिल्हा परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ १७ फेब्रुवारी रोजी संपत असल्याने अखेरच्या सांस्कृतिक कार्यक्रमात अनेक सदस्य व पदाधिकारी नृत्य व मनोरंजन करण्यात गुंग होते.

हा कार्यक्रम पालघर पोलीस स्टेशन जवळ असल्याने रात्री एक वाजल्याच्या सुमारास एक पोलीस उपनिरीक्षक व त्यांचे सहकारी कार्यक्रम स्थळी गेले. सुरू असलेल्या कार्यक्रमातील आवाजाची ध्वनिफीत काढून त्यांनी ध्वनीक्षेपक यंत्रचालकाला आवाज बंद करण्याच्या सूचना दिल्या.

पोलिसी खक्यात हे संभाषण झाल्याने मौजमजा करण्याच्या धुंदीत असणाऱ्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व पदाधिकारी दुखावले गेले. हा कार्यक्रम कोणाचा आहे, आम्ही कोण आहोत अशा स्वरूपात कार्यक्रम स्थळी उपस्थित असणाऱ्या काही जिल्हा परिषद सदस्यांनी तत्सम पोलिसांकडे विचारणा केली. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष व सदस्य यांनी पोलिस कर्मचाऱ्यांच्या उर्मट वर्तनाबाबत आक्षेप नोंदवला. मात्र आपण कायद्याचे पालन करत असल्यावर पोलीस कर्मचारी ठाम राहिल्याने उभयतांमध्ये सुमारे २० मिनिटं जोरदार वादंग पेटला.

संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी आपण कोणतेही गैरकृत्य केल्या नसल्यावर अखेर पर्यंत ठाम राहिले. त्यानंतर हा कार्यक्रम बंद करून जिल्हा परिषद सदस्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे दाद मागण्यासाठी गेले असल्याची माहिती पुढे आली आहे. पालघर पोलीस ठाण्याच्या स्टेशन डायरीमध्ये या घटनेची नोंद करण्यात आली असून दोन्ही बाजूमध्ये निर्माण झालेले गैरसमज दूर झाल्याची माहिती पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अनंत पराड यांनी लोकसत्ताला दिली.

दरम्यान जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता सरस कार्यक्रमासाठी ध्वनीक्षेपक वाजवण्यासाठी परवानगी घेण्यात आल्याचे सांगितले. मात्र अकरा वाजल्यानंतर रात्री एक कार्यक्रम सुरू असल्याची माहिती आपल्याला नसल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) चंद्रशेखर जगताप यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांच्याशी संपर्क साधला असता कार्यक्रम लांबल्याने तसेच उशिरापर्यंत चालल्याबद्दल आम्ही संबंधित पोलीस कर्मचाऱ्याकडे दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र त्यांच्या उर्मट स्वभावामुळे काही काळ वाद झाल्याचे मान्य करत हे प्रकरण मिटल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader