पालघर: उन्हाळी सुट्टय़ांच्या ऐन हंगामामध्ये पश्चिम रेल्वेने आठवडाअखेरीस सलग तीन दिवस पालघर ते डहाणू रोडदरम्यान मेगा ब्लॉक घेतल्याने प्रवाशांचे हाल झाले. मेगा ब्लॉकदरम्यान या मार्गावर पर्यायी व्यवस्था अपुरी पडल्याने प्रवासी उष्माधारांनी न्हाऊन निघाले, तसेच नियोजित ठिकाणी पोहोचण्यास काही तासांचा विलंब झाला.
गेल्या रविवारी (२२ मे रोजी) वाणगाव- डहाणू रोडदरम्यान विद्युत प्रणालीमध्ये बदल करण्यासाठी घेतलेल्या आठ तासांच्या मेगा ब्लॉकदरम्यान गैरसोयीची पुनरावृत्ती २७ ते २९ मेदरम्यान घेतलेल्या मेगा ब्लॉकच्या वेळी प्रवाशांना अनुभवायला मिळाली. पालघर व बोईसरदरम्यान ओव्हरहेड विद्युत प्रणाली तर वाणगाव व डहाणू रोडदरम्यान गर्डर बदलण्याच्या कामी या तीन दिवसांत सकाळच्या प्रहरी दोन ते अडीच तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला होता.
मुळात २७ मेपासून सुरू होणाऱ्या सलग तीन दिवसांच्या मेगाब्लॉकची माहिती २६ मे रोजी दुपारी उपलब्ध झाली. त्यामुळे अनेक प्रवाशांपर्यंत माहिती पोहोचण्यास शक्य न झाल्याने प्रवासासाठी निघाल्यानंतर मेगा ब्लॉकमुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागला. मेगा ब्लॉकचे आयोजन करताना पालघर व डहाणू रोडदरम्यान काही उपनगरीय गाडय़ांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या, तर काही गाडय़ा पालघपर्यंतच आणून परत फिरवण्यात आल्या होत्या. त्यामुळे पालघरहून बोईसर, वाणगाव व डहाणूपर्यंत जाण्यासाठी नागरिकांना खासगी वाहने रिक्षा व एसटी बसगाडय़ांचा आधार घ्यावा लागला. बसगाडय़ांमध्ये तुडुंब गर्दी होत असल्याने लहान मुले व सामान घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मेगा हाल झाले, तर ज्येष्ठ नागरिकांना खासगी व रिक्षाने प्रवास करण्याची वेळ ओढवली. तीन दिवसांतील मेगा ब्लॉक नियोजित वेळेत पूर्ण झाले असले तरीही उपनगरीय व लांब पल्ल्याच्या गाडय़ा एक ते दोन तास विलंबाने सायंकाळपर्यंत धावत राहिल्या. यामुळे पश्चिम रेल्वेची विरारपलीकडची उपनगरीय व लांब पल्ल्याची सेवा तीन दिवस विस्कटलेली राहिली. विलंबाने धावणाऱ्या गाडय़ांमध्येदेखील प्रवाशांची गर्दी झाल्याचे चित्र सर्वत्र होते. उन्हाळय़ाच्या सुट्टीत यादरम्यान नागरिकांची विविध ठिकाणी ये-जा सुरू असताना पश्चिम रेल्वेने घेतलेल्या या मेगा ब्लॉकमुळे अनेकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.
एसटीचे ७५ हजारांचे अतिरिक्त उत्पन्न
राज्य परिवहन विभागाने मेगा ब्लॉकच्या तीन दिवसांत किमान ६० अतिरिक्त फेऱ्यांद्वारे ७५ हजार रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळविले. पालघर, बोईसर व डहाणू आगारातून ज्यादा बस सेवा सोडण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

Story img Loader