प्रलंबित मागण्यांबाबत प्रशासनाकडून नकारात्मक प्रतिसाद

पालघर : पायाभूत सुविधांच्या बाबतीत प्रलंबित असणाऱ्या वेगवेगळय़ा प्रश्नांबाबत रेल्वेने नकारात्मक भूमिका घेऊन प्रवाशांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. पश्चिम रेल्वेच्या विभागीय समितीचे सदस्य हृदयनाथ म्हात्रे यांनी प्रवाशांच्या समस्यांबाबत उपस्थित केलेल्या वेगवेगळय़ा प्रश्नांबाबत रेल्वे प्रशासनाने त्यांना लेखी उत्तर पाठवले असून उपस्थित समस्या सोडवण्यास प्रशासनासमोर उद्भवणाऱ्या वेगवेगळय़ा अडचणी मांडल्या आहेत.

पालघर व बोईसर रेल्वे स्थानकांत ट्रेन कोच पोझिशन दर्शवणारे इंडिकेटर बसवण्याबाबत मांडलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पालघर व बोईसर ही स्थानके उपनगरीय क्षेत्रात असल्याचे कारण पुढे करीत बिगर उपनगरीय क्षेत्रातील प्रमुख रेल्वे स्थानकांत अशी सुविधा उपलब्ध करण्याची तरतूद असल्याचे रेल्वेने म्हटले आहे. असे असताना वसई रोड, बोरिवली, अंधेरी व दादर ही प्रमुख स्थानके एसजी अर्थात उपनगरीय कार्यक्षेत्रात असताना त्या ठिकाणी डब्यांची माहिती दर्शवणारे फलक इतर स्थानकात उपलब्ध आहे. मात्र पालघर, बोईसर स्थानकांबाबत रेल्वे प्रशासन दुजाभाव का करते असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे.

उपनगरीय गाडय़ांना पालघर, बोईसर, वाणगाव व केळवे रोड येथे बाजूला ठेवल्या जात असल्याने विलंब होत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर रेल्वे प्रशासन विलंबाने धावणाऱ्या मेल-एक्सप्रेस रेल्वेगाडय़ांना प्राधान्य देण्यासाठी उपनगरीय सेवांना नाइलाजाने बाजूला काढून ठेवावे लागत असल्याचे उत्तरामध्ये नमूद करण्यात आले आहे. सध्या विरार-डहाणू रोड क्षेत्रातील रुळावरून क्षमतेच्या १४४ टक्के वापरत असून डिसेंबर २०२२ मध्ये समर्पित मालवाहू मार्ग कार्यरत झाल्यास मालगाडय़ांचा या मार्गावरील ताण कमी झाल्यानंतर प्रवाशांची होणारी गैरसोय कमी करणे तसेच रेल्वेगाडय़ांची संख्या वाढवण्याचे विचार करता येईल, असे उत्तरात नमूद आहे.

सफाळा व वाणगाव रेल्वे स्थानकांत सरकते जिने (एस्कलेटर) बसविण्याचे काम सुरू असून यंदाच्या आर्थिक वर्षांअखेपर्यंत हे काम पूर्ण होईल असे आश्वासित करण्यात आले आहे. सरकते जिने (एस्कलेटर) बसवण्यासाठी दररोज २५ हजार प्रवाशांची ये-जा (फूटफॉल) स्थानकांत होणे अपेक्षित असून वैतरणा व डहाणू रोड येथे या निकषांची पूर्तता होत नसल्याने सरकते जिने बसविणे अजूनही विचाराधीन नसल्याचे रेल्वेने कळवले आहे. मात्र एकीकडे असे सांगून प्रवासी संख्या भरपूर असूनही पालघर व बोईसर स्थनकांमध्ये सरकत्या जिन्यांची  सुविधा देण्यापासून वंचित का ठेवण्यात आल्याचे मात्र रेल्वेने स्पष्टीकरण देण्याचे टाळले आहे.

सफाळे, उमरोळी व डहाणू रोड या स्थानकांवरील फलाटाची लांबी मर्यादित असल्याने १५ डब्यांच्या उपनगरीय सेवा सुरू करण्यास अडचणी येत असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे. तसेच सकाळी ७.०५ वाजता डहाणू रोडहून विरारकडे जाणारी पूर्वीची लोकलसेवा पूर्ववत करण्यास त्याजागी धावणाऱ्या मेल-एक्सप्रेस गाडय़ांचे वेळापत्रक कारणीभूत असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. फ्लाइंग राणी एक्सप्रेस या रेल्वेगाडीत महिला व प्रथम दर्जासाठी स्वतंत्र डबे देण्यात आले असून या पट्टय़ातील रुळांची क्षमता वाढ झाल्यानंतर उपनगरीय सेवांची संख्या वाढवण्यात येईल, असे रेल्वेने पाठविलेल्या उत्तरात नमूद करण्यात आले आहे.

दादर- डहाणू रोड थेट लोकल सेवा लवकरच

दादरहून सायंकाळी ०४.४७ वाजता निघणाऱ्या विरार लोकलला थेट डहाणू रोडपर्यंत नेणे शक्य असल्याचे पश्चिम रेल्वेने कळविले असून ही सेवा लवकरच सुरू होईल असे आश्वासन देण्यात आले आहे.

Story img Loader