पालघर :  जिल्ह्यातील अनेक रेल्वे स्थानकांमध्ये मूलभूत सुविधा मिळत नसल्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. असलेल्या सुविधांचीही दुरवस्था झाली असून तसेच आपत्कालीन व्यवस्थाही निरुपयोगी असल्यामुळे प्रवाशांना त्रासदायक  प्रवासातून जावे लागत आहे. वैतरणा ते डहाणू रेल्वे स्थानकांवरील अनेक स्थानकांमध्ये सुविधा यंत्रणांमध्ये  त्रुटी पाहावयास मिळत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पश्चिम रेल्वेवरील वैतरणा ते डहाणू ही उपनगरीय रेल्वे सेवा म्हणून घोषित करण्यात आली आहे. या दरम्यान आठ स्थानके येतात.  या स्थानकातून दररोज लाखो प्रवाशांची  ये-जा सुरू असते. मात्र स्थानकांवरील अनेक भौतिक व मूलभूत सुविधा तसेच आपत्कालीन यंत्रणांबाबत या भागाला नेहमीच रेल्वे सावत्र दर्जा देत  असल्याचा प्रवासांचा आरोप असतो.  रेल्वे स्थानकांवर प्रवासी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही नाहीत. जे सुरू केलेत तेही बंद किंवा नादुरुस्त आहेत. येथील अग्निशमन यंत्रणा घटनेच्या वेळेत पोहोचू शकत नाही. कारण स्थानकात येण्यासाठी मार्गच मोकळा नाही. स्थानक परिसरात अतिक्रमण, खासगी वाहनांचे पार्किंग, बस थांबे व इतर कारणांमुळे रस्ते अरुंद आहेत.

फलाटांवर सुसज्ज वैद्यकीय सुविधा नाहीत.  फलाटांवर नोंदणीकृत हमाल अनेक वर्षांपासून नाहीत. त्यांची कामे खासगी व्यक्तींमार्फत करवून घेतली जातात. अनेक फलाटांवर पिण्याच्या पाण्याच्या पाणपोई असल्या तरी नावापुरत्याच आहेत. त्याला पाणीच नाही. काही ठिकाणी या पाणपोईमधून अस्वच्छ पाणी येत आहे. फलाट चकाचक करण्यात येत असले तरी प्रवासी वर्गासाठी असलेल्या सुविधेमध्ये अनेक त्रुटी असल्याचे काही प्रवासी सांगत आहेत.  करोनाकाळात पालघर येथे आणलेल्या कोव्हिड एक्स्प्रेसमध्ये पाण्याचा मोठा अभाव दिसून आला होता. त्यामुळे रुग्णांचेही हाल झाले होते. शेवटी हे रुळावरचे रुग्णालय वापरणे बंद  झाले. फलाटांवरील काही शौचालये दुरवस्थेत आहेत. बोईसर रेल्वे स्थानावर बांधलेला पूल खूप लांबीचा असल्याने प्रवासी वर्ग पूल ओलांडताना थकून जातात.  परिणामी प्रवासी जीव धोक्यात घालून रूळ ओलांडताना दिसतात.

विद्युत, अग्नी समस्यांकडे दुर्लक्ष 

रेल्वेकरिता उच्च दाबाची विद्युतवाहिनी वापरण्यात येत असून सर्व सिग्नल व इतर यंत्रणा ही विद्युत प्रणालीवर चालू असते. यापूर्वी काही ठिकाणी शॉर्टसर्किटमुळे किंवा विद्युत आग लागल्यामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असता ती हाताळण्यासाठी योग्य ती खबरदारी व उपाययोजना नसल्याचे दिसून येते अशा प्रवाशांकडून सांगितले जाते.

आपत्कालीन यंत्रणा निरुपयोगी

स्थानकात संकटकाळात उपयोगी पडणारी यंत्रणाही निरुपयोगी ठरत आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या चार महिला रेल्वे गाडी पकडण्यासाठी फलाट क्रमांक दोनवर जात होत्या. पूल चढण्यासाठी त्यांनी उद्वाहनाचा आधार घेतला. मात्र उद्वाहनात तांत्रिक बिघाड झाला व महिला त्यात तब्बल दीड तास अडकल्या. यामध्ये दोन महिला डॉक्टर तर दोन जण शालेय व्यवस्थापनाच्या प्रतिनिधी होत्या. अनेक हाका मारून मदतीचा धावा केल्यानंतरही रेल्वे तांत्रिक विभागाकडून त्यांना मदत प्राप्त झाली नाही. शेवटी दूरध्वनीवरून मदत मागितल्यानंतर अग्निशमन, लोहमार्ग व रेल्वे सुरक्षा बल तसेच इतर प्रवासी व स्थानिकांनी शर्थीचे प्रयत्न करून या महिलांची सुटका केली. अशी संकटे अनेक प्रवाशांवर येत असतात, परंतु रेल्वे प्रशासनास त्याचे गांभीर्य नसल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे.

उपनगरीय दर्जा प्राप्त झाल्यानंतर गेली २९ वर्षे उपनगरीय कर प्रवासी वर्गाकडून वसूल केला जातो. मात्र या भागातील  प्रवासी वर्गाच्या सोयीसुविधा, सुरक्षा, मूलभूत-भौतिक गरजा याबाबतीत रेल्वेकडून सावत्रपणाची वागणूक आजही कायम आहे. 

दयानंद पाटील, सचिव, डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था