वाडा: दोन दिवस वादळीवाऱ्यासह कोसळत असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या भात पिकाचे, रब्बी पिकाचे तसेच भाजीपाला शेतीचे नुकसान तर केलेच पण या वादळीवाऱ्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून रस्त्यावर पडल्याने वाहतूक ठप्प झाली. प्रवाशांना काही तास रस्त्यातच अडकावे लागल्याने त्यांचे मेगा हाल झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाडा – मलवाडा – जव्हार हा रस्ता काही किलोमीटर अंतर जंगलपट्टी भागातून जात असल्याने या मार्गावर ठिकठिकाणी झाडे उन्मळून रस्त्यावर पडली होती, तर काही ठिकाणी झाडांचे फाटे मोडून रस्त्यावर आले होते. यामुळे या मार्गावरील वाहतूक अनेक ठिकाणी ठप्प झाली होती. एसटी बसने प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना रस्त्यातच अडकून राहावे लागले होते.

माणुसकी अजुनही जिवंत

ज्या ज्या ठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळून अडथळा निर्माण झाला होता अशा ठिकाणचे स्थानिक आदिवासी बांधव हातात कु-हाड, कोयता घेऊन पोहचले त्यांनी रस्त्यावर पडलेली झाडे, झाडांच्या फांद्या हटविण्यात मोलाचा वाटा उचलला. व माणुसकीचे दर्शन घडविले. सोमवारी पहाटे पासुन सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत वाडा – मलवाडा – जव्हार मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. ती साडेनऊ नंतर सुरळीत झाली.

विविध ठिकाणच्या रस्त्यावर झाडे कोसळल्याने वाडा बस स्थानकातून सुटणा-या काही बस फे-या रद्द कराव्या लागल्या. – जे.बी. पाटील, वाहतूक नियंत्रक, वाडा बस स्थानक.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Passengers were stuck in the traffic due to the trees fell on the road because of storm in wada dvr