पालघर जिल्हा परिषद, पंचायत समितीत सुमारे ७० टक्के मतदान; आज निकाल
पालघर : पालघर जिल्हा परिषदेच्या १५ व चार तालुक्यांतील पंचायत समितीच्या १४ जागांसाठी पोटनिवडणूक आज शांततेत पार पडली. सुमारे ७० टक्के म्तदान झाले. या जागांसाठी उमेदवारी दाखल केलेल्या ११४ उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा बुधवारी निकाल लागणार आहे. अनेक जागांसाठी बहुरंगी लढती झाल्या असून अटीतटीच्या लढतींमध्ये कोण बाजी मारतो हे उद्या निकालातून कळणार आहे.
पालघर, वाडा, डहाणू या तालुक्यात प्रामुख्याने अधिक जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप तसेच काँग्रेस पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी प्रचारात जिल्ह्यातील भागाचा दौरा केला. त्याचप्रमाणे अनेक मतदारसंघांमध्ये भौगोलिक क्षेत्राची व्याप्ती मोठी असल्याने मतदारांपर्यंत पोहोचणे उमेदवारांना प्रचारादरम्यान कठीण झाले होते. शिवाय ग्रामीण भागांतील अधिकतर मतदार हे शेतमजूर असल्याने त्यांच्याशी दिवसा संपर्क साधण्यास उमेदवारांना अडचणी येत होत्या.
बहुरंगी लढतीमध्ये नागरिकांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी अनेक ठिकाणी आर्थिक प्रलोभन देण्यात आले. त्याचबरोबरीने स्थानिक समस्यांबाबत अनेक पक्षांतर्फे वेगवेगळे आश्वासने प्रचारादरम्यान देण्यात आली. तरीदेखील मंगळवारी सकाळी मतदान सुरू झाल्यानंतर आरंभीच्या पहिल्या दोन सत्रांमध्ये जेमतेम ३० टक्के मतदान झाल्याचे दिसून आले. दुपारच्या सत्रात अनेक मतदार आपले मतदान कार्ड घेऊन मतदान करण्याच्या प्रतीक्षेत घराबाहेर उमेदवार आपल्याला पाचारण करतील याच्या प्रतीक्षेत होते. मतदान करण्यासाठी अनेक ठिकाणी उमेदवारांनी मतदारांना वाढीव प्रलोभन दिल्यानंतर सायंकाळच्या सत्रात मतदान केंद्रांवरील गर्दी वाढल्याचे चित्र दिसून आले.
सकाळी साडेतीन वाजेपर्यंत सुमारे ५१ टक्के मतदान झाले असले तरी मतदान संपेपर्यंत ही टक्केवारी ७०-८० टक्क्यांपर्यंत पोहोचेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला. अनेक ठिकाणी आणि इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्याने प्रत्यक्षात झालेल्या मतदानाची टक्केवारी मध्यवर्ती कार्यालयापर्यंत कळविण्यास विलंब लागत होता. काही ठिकाणी मतदान ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने काही काळ मतदान प्रक्रिया खंडित झाली होती.
तालुकानिहाय मतमोजणी
मतदान झालेल्या या सर्व ठिकाणांची तालुकास्तरीय मतमोजणी होणार असून त्यासाठी संबंधित निवडणूक अधिकारी व्यवस्था केली आहे. पोटनिवडणुकीचे निकाल उद्या दुपापर्यंत हाती लागण्याची शक्यता. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, कम्युनिस्ट पक्ष यांच्या रिक्त झालेल्या जागांपैकी किती जागा राखल्या जातील हे निकालावरून स्पष्ट होणार आहे.
पैसे वाटल्याचे आरोप
ग्रामीण भागांत अनेक ठिकाणी नागरिकांनी मतदार संख्यानिहाय याद्या तयार करून विविध पक्षांच्या उमेदवारांकडून विशिष्ट रकमेची मागणी करण्यात येत होती. अनेक राजकीय पक्षांनी प्रति मताला ३०० पासून ५०० रुपये तर चुरशीच्या लढतीच्या ठिकाणी निवडक मताला हजार ते दोन हजार रुपये इतका दर देण्यात आल्याचे आरोप काही सामाजिक संघटनांनी केला आहे.
ज्येष्ठांचाही उत्साह
जिल्ह्य़ात ८० वर्षांंवरील ज्येष्ठांनीही मतदानाचा हक्क बजावला. वाडा तालुक्यात वावेघर मतदान केंद्रावर ८४ वर्षीय व सोनाळे खुर्द येथील एका ९३ वर्षीय वयोवृद्ध महिलेने मतदानाचा हक्क बजावला. इतर अनेक तालुक्यांतही ज्येष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता.
वसईत ७५ टक्के मतदान लोकसत्ता वार्ताहर
वसई: वसई पंचायत समितीच्या तिल्हेर भाताणे या दोन गणाच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले. करोनाकाळानंतर वसईत पहिलीच पोटनिवडणूक असल्याने ग्रामीण भागातील मतदारांनी मतदानाला चांगलाच प्रतिसाद दिल्याचे चित्र दिसून आले. सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदान केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. संध्याकाळपर्यँत तिल्हेर व भाताणे दोन्ही गणात ७५.३४ टक्के इतके मतदान झाले आहे.ओबीसी आरक्षणाच्या मुद्दय़ावरून वसई पंचायत समिती भाताने व तिल्हेर या गणातील सदस्यांची निवड रद्द करण्यात आली होती. त्या जागेवर आता नव्याने पोटनिवडणूका घेण्यात येत आहेत.या पोटनिवडणुकीसाठी १०७ व १०९ या दोन्ही गणातून १० उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी मंगळवारी तिल्हेर व भाताणे येथील एकूण २८ केंद्रावर मतदान पार पडले. सुट्टीचा दिवस नव्हता तरी सुद्धा नागरिकांनी सुट्टी घेऊन तर अर्ध्या दिवसाची सुट्टी टाकून प्रथम मतदानाला प्राधान्य दिल्याचे चित्र पहायला मिळाले. मतदान करण्यासाठी युवा मतदारांपासून ते वयोवृद्ध नागरिकांनी मतदान केंद्रावर हजेरी लावली होती. सकाळी ७.३० ते ११.३० या चार तासात तिल्हेर गणात ४०.९४ टक्के तर भाताणे गणात ४२. ५५
टक्के इतके मतदान झाले होते.दुपारच्या सत्रात अनेक मतदान केंद्रात शुकशुकाट पहायला मिळाला. मात्र दुपार नंतर पुन्हा एकदा मतदान केंद्रावर मतदारांचा ओघ वाढला होता.विशेष करून महिला मतदार घरकाम आटोपून मिळालेल्या सवडीनुसार मतदानासाठी बाहेर पडताना दिसून आले. दुपारी ३.३० पर्यँत तिल्हेर मधील मतदान ६५.५७ टक्के तर भाताणे मध्ये ६३.९६ टक्के इतके झाले होते. तर संध्याकाळी अखेरपर्यंत तिल्हेर ७५.३३टक्के व भाताणे ७५.३४ टक्के इतके मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे. मतदान केंद्राच्या ठिकाणी कोणताच अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
धानीवरीत दोन पाडय़ांचा मतदानावर बहिष्कार
डहाणू : ओसरविरा गणामधील धानीवरी ग्रामपंचयातीमधील सुसरी नदीवर पूल बांधण्याच्या मागणीकडे प्रशासन वारंवार दुर्लक्ष करीत असल्याने दहिगाव पानोदपाडा आणि डोंगरीपाडा या पाडय़ातील ६००हून अधिक मतदारांनी पोटनिवडणुकीवर बहिष्कार टाकला. नदी प्रवाहात थांबून ग्रामस्थांनी प्रशासनाच्या भोंगळ कारभाराकडे व जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधले. अनेक राजकीय पक्षांनी ग्रामस्थांची मनधरणी केली मात्र ग्रामस्थांनी एकजुटीने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. पुलाअभावी ग्रामस्थांना नदीत उतरून मार्ग काढावा लागतो. पुरामध्ये जिवाची जोखीम पत्करावी लागते, अशी परिस्थिती असल्याचे येथे सांगितले जाते. दरम्यान, डहाणू तालुक्यातील चार जिल्हा परिषद आणि दोन पंचायत समितीसाठी आज मतदान शांततेत पार पडले. सकाळपासून मतदार बाहेर काढण्यात विविध पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागलेले पाहायला मिळत होते. दरम्यान कासा गटात शेतकरी आपल्या शेतीच्या कामात व्यस्त पाहायला मिळाले. सकाळी ११ ते १च्या दरम्यान मतदारांनी मोठय़ा रांगा लावलेल्या पाहायला मिळाल्या.
निवडणुकीमुळे ७० टक्के शाळा बंद
वाडा : करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षांंपासून बंद असलेल्या शाळा सोमवारपासून सुरू करण्यात आल्या. मात्र पालघर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत मतदान केंद्रासाठी तालुक्यातील शाळांच्या इमारती ४ ऑक्टोबरपासूनच ताब्यात घेतल्याने येथील ७० टक्के शाळा अजूनही बंदच आहेत. बुधवारच्या मतमोजणीपर्यंत त्या बंद राहणार असून गुरुवारपासून त्या सुरू होतील असे सांगण्यात येते. पालघर जिल्ह्यातील काही तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या एकूण २९ गणगटांमध्ये होत असलेल्या पोटनिवडणुकांच्या मतदानासाठी दोनशेहून तर वाडा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सहा गटांपैकी पाच गटात व पंचायत समितीच्या निवडणुंकासाठी शंभरहून अधिक शाळा ताब्यात घेण्यात आल्या आहेत. वाडा येथील चार हजारांहून अधिक विद्यार्थी संख्या असलेली पांडुरंग जावजी चौधरी ही माध्यमिक शाळा चार दिवसांसाठी घेतल्यामुळे शाळा अजून दोन दिवस सुरू होणार नाही, असे सांगितले जाते.