देश-परदेशातील एक हजार दुर्मीळ झाडांची लागवड

नीरज राऊत

पालघर : मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात येणाऱ्या काळात वनस्पती उद्यानाची उभारणी करण्यात येणार आहे. या ठिकाणी एक हजार पेक्षा अधिक प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात येणार आहे. या अभिनव प्रकल्पामध्ये पालघर जिल्ह्य़ातील सफाळा येथील वृक्षमित्र प्रकाश काळे हे महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

देशांमध्ये १२०० ते १३०० प्रकारची वेगवेगळी झाडे व दीडशेहून अधिक प्रकारचे वेलवर्गीय झाडे आहेत. त्यापैकी राज्यात ३५० प्रकारचे तर मुंबईमध्ये १५० पेक्षा अधिक प्रकारची झाडे आढळून येत आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात काही सामाजिक संस्थांच्या मदतीने ५० एकर क्षेत्रावर देशात विविध ठिकाणी सापडणारी एक हजारपेक्षा अधिक झाडांची लागवड करण्यात येणार आहे. अशा प्रकारे एकाच वनस्पती उद्यानामध्ये देशात आढळणाऱ्या झाडांच्या प्रजाती व काही निवडक दुर्मीळ विदेशी झाडे, त्यांची माहिती संग्रहितपणे प्रदर्शित करण्याचा हा दुर्मीळ योग राहणार आहे.  पर्यटक तसेच निसर्गप्रेमासाठी हे आकर्षणाचे ठिकाण ठरणार आहे.

या संदर्भात प्रसिद्ध नट व वृक्ष लागवडीसाठी विशेष प्रयत्न करणारे सयाजी शिंदे यांच्या सह्यद्री देवराई या सामाजिक संस्थात व वन विभागांमध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. या उद्यानाची आखणी करण्यासाठी या प्रकल्पात सहभागी सामाजिक संस्थांनी तज्ज्ञांकडून उद्यानाचा आराखडा व सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहेत.  देश-परदेशातील उपलब्ध काही प्रजातींची लागवड करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे लागवडीच्या जातींच्या वनस्पतीचे जैविक प्रणालीतील नाव, त्यांच्या प्रजातीं- उपजातींची माहिती तसेच झाडाची हिंदी व मराठी स्थानिक पातळीवर ओळख, औषधी उपयोग, लागवड पद्धत या संदर्भात संग्रहित माहिती सोबत प्रकाशित करण्यात येणार आहे.

प्रकल्पात महत्त्वाची भूमिका बजावणारे वृक्षमित्र प्रकाश काळे यांनी राज्यात अनेक ठिकाणी वानस्पतिक बगीचे उभारणे, झाडांची ओळख करण्यासाठी तसेच झाडांविषयी माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी  भ्रमंती केली आहे.  त्यांची ‘वनस्पती बाड’, ‘दिव्य औषधी वनस्पती‘, ‘औषध दारात‘, ‘सफर मुंबईच्या वृक्ष तीर्थाची‘, ‘उटणे वापरा बारा महिने‘, ‘नक्षत्र व मानव‘ अशी आठ वनस्पती विषयी माहिती देणारी व प्रवास वर्णन करणारी पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

संस्कृत भाषेचा तसेच आयुर्वेदिक ग्रंथांचे गाढा अभ्यास, आदिवासी बांधव, मांत्रिक, वैदू यांच्याकडून उपलब्ध झालेली वन औषधांची माहिती तसेच व्यवसायानिमित्त मुंबई सह राज्यातील विविध ठिकाणी केलेल्या सफारी दरम्यान संकलित केलेली माहिती प्रकाश काळे या नवीन प्रकल्पात प्रदर्शित करण्याच्या प्रयत्न करणार आहेत.

वृक्षमित्र प्रकाश काळे यांचे योगदान

कंपोस्ट खताचा व्यवसाय करणारे वृक्षमित्र प्रकाश काळे यांनी व्यवसाय सांभाळत देश-विदेशात आढळणारी साडेतीनशेहून अधिक झाड संग्रहित केली आहेत. १९९७ ते २०१७ दरम्यान  त्यांनी राज्यात विविध ठिकाणी तसेच नामांकित संस्थांमध्ये उपलब्ध झाडांच्या सविस्तर माहितीसह ३५ ठिकाणी प्रदर्शने आयोजित केली आहेत. या उपक्रमाबद्दल माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्यासह अनेक मान्यवरांकडून त्यांचे कौतुक व सत्कारही झाले आहेत. त्यांच्याकडे पाण्याच्या उपलब्धतेची समस्या निर्माण झाल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडील वृक्षसंपदा ओरस (सिंधुदुर्ग) येथील मेट्रोपॉलिटन महाविद्यालयाकडे सुपूर्द केली.  राज्यात अनेक ठिकाणी वनस्पती बगीचे तयार करण्यास त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले असून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात या प्रकल्पाची आखणी केल्यानंतर येत्या काही महिन्यात प्रत्यक्षात वृक्ष लागवडीला आरंभ होईल असे प्रकाश काळे यांनी ‘लोकसत्ता‘ला सांगितले.