हळदपाडा ते उधवा या १२  किलोमीटर रस्त्यावर आंदोलन

डहाणू: तालुक्यातील हळदपाडा ते उधवा या १२ किमीच्या रस्त्याची खड्डय़ांमुळे दुरवस्था झाली आहे. हा मार्ग पूर्वभागातील नागरिकांसाठी सायीचा असल्याने या वरून रहदारी जास्त आहे. मात्र, पावसाळ्यात या रस्त्याला खड्डे पडून त्यात जागोजागी पाणी साचल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेतृत्वाखाली आंदोलन करताना रस्त्यावरील खड्डय़ांमध्ये वृक्षारोपण करून आपला संताप व्यक्त केला.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दापचरी सीमा तपासणी नाका चुकवण्यासाठी अवजड वाहने सर्रासपणे दादरा नगर हवेलीहुन उधवा- धुंदलवाडीमार्गे मुंबई-अहमदाबाद मार्गे नेली जातात. तीन दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी अतिरिक्त माल नेणारे वाहन पोलिसांच्या ताब्यात देऊन ६३ हजाराचा दंड वसूल केला होता. २० गावांना जोडणारा हा रस्ता पुढे दादरा नगर हवेलीकडे जातो. दरम्यान, रस्त्याला पडलेल्या खड्डय़ांमुळे वेळ आणि इंधन खर्चाचा भुर्दंड नागरिकांवर पडत आहे. यामुळे बांधकाम विभागाने आता केवळ खड्डे बुजवून तात्पुरती मलमपट्टीकरण्यापेक्षा यंदा या रस्त्याचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण करण्याची मागणी नागरिकांतून जोर धरत आहे.

राज्यमार्गावर क्षमतेपेक्षा जास्त अवजड वाहतूक केली जात असल्यामुळे उधवा- मोडगाव- हळदपाडा हा प्रमुख राज्यमार्ग धोकादायक बनला आहे. दापचरी तपासणी नाका वाचवण्यासाठी दादरा नगर हवेली, उधवा येथे जाणारी अवजड वाहने धुंदलवाडी राज्यमार्गावरून जातात. डहाणू तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका प्रमुख, माजी बांधकाम सभापती काशिनाथ चौधरी यांनी मंगळवारी खड्डय़ांसमोर बसून धुंदलवाडी नाका येथे धरणे आंदोलन पुकारले. यावेळी पंचायत समिती सदस्य प्रवीण गवळी तसेच महिला पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी आदोलनात भाग घेतला.

डहाणू पूर्व भागात धुंदलवाडी उधवा मार्गावर जाण्यासाठी हा रस्ता सोयीचा आहे. या महत्त्वाच्या रस्त्याची केवळ डागडुजी करून जनतेची बोळवण केली जात आहे. गतवर्षीच्या खडे बुजवण्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणी काशिनाथ चौधरी यांनी केली आहे.

धुंदलवाडी उधवा मार्गावरील खड्डे तात्काळ भरण्यात यावेत. या मार्गावरील अवजड वाहतूक बंद न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.

– काशीनाथ चौधरी, डहाणू तालुका प्रमुख, राष्ट्रवादी काँग्रेस</strong>

लवकरच हा मार्ग नागरिकांसाठी सोयीचा ठरेल. संबंधितांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. या रस्त्याचे खड्डे भरण्याचे काम हाती घेतले आहे.

– धनंजय जाधव, उप अभियंता, सा.बां. विभाग, डहाणू