वाडा: ग्रामपंचायतीची निवडणूक ही राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नाही, गावपातळीवर असलेल्या या निवडणुकीत राजकीय पक्षांना अजिबात थारा देऊ नका, जास्तीत जास्त सदस्य बिनविरोध कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करा असे आवाहन पालघर जिल्ह्यातील जिजाऊ सामाजिक संघटना व श्रमजीवी संघटना यांनी गावपातळीवरील कार्यकर्त्यांना केले आहे.
ग्रामपंचायतीची निवडणूक राजकीय पक्षांच्या अधिकृत चिन्हावर लढवली जात नसतानाही काही राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते गावागावांत येऊन गावातील चांगले वातावरण बिघडवीत असतात. गावपातळीवरील या निवडणुकीत कुटुंबात वाद निर्माण केले जातात. यामुळे संपूर्ण गावातील कौटुंबिक वातावरण बिघडून जाते व गावाचा विकास थांबतो. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील आपापसातील वाद मिटवण्यासाठी कुठलाही राजकीय पक्ष पुढे येत नाही. पोलीस ठाण्यात, न्यायालयात हे वाद जाऊन अनेकांचा वेळ वाया जातो, अर्थिक भरुदड सोसावा लागतो. यामुळे येत्या १३ ऑक्टोबर रोजी पालघर जिल्ह्यात होत असलेल्या ३४२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका ग्रामस्थांनी बिनविरोध कराव्यात असे आवाहन पालघर जिल्ह्यातील जिजाऊ सामाजिक संघटना व श्रमजीवी संघटना या दोन प्रमुख संघटनांनी केले आहे. दरम्यान, ग्रामपंचायतींना वित्त आयोग, पेसा, अशा विविध योजनांचे प्रतिवर्षी लाखो रुपयांचा निधी शासनाकडून थेट ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा होत असतो. हा निधी खर्च करण्याचा संपूर्ण अधिकार ग्रामपंचायत पदाधिकारी यांना असल्यामुळे या निधीवर डोळा ठेवून काही कार्यकर्ते ग्रामपंचायत निवडणुकीत सहभागी होत असतात असे म्हटले जात आहे.
बिनविरोध निवडून येणाऱ्यांना एक लाख
ज्या ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व सरपंच पद बिनविरोध निवडून येतील त्या ग्रामपंचायतीला जिजाऊ या सामाजिक संघटनेकडून एक लाख रुपयांचे इनाम दिले जाईल, अशी घोषणा जिजाऊ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नीलेश सांबरे यांनी केली आहे.
ग्रामपंचायत निवडणूक ही एका गावापुरती मर्यादित असते, बाहेरील व्यक्तींनी या निवडणुकीत हस्तक्षेप करून गावातील चांगले वातावरण दूषित करू नये.
-नीलेश सांबरे, संस्थापक अध्यक्ष, जिजाऊ सामाजिक संघटना.
निवडणुकीनिमित्ताने वाद गावाच्या विकासासाठी मारक ठरतात, यासाठी ग्रामस्थांनी बिनविरोध सदस्य निवडून गावात आदर्श निर्माण करावा.
-विजय जाधव, जिल्हा सरचिटणीस, श्रमजीवी संघटना, पालघर जिल्हा.