बोईसर :औद्योगिक सांडपाण्याची बेकायदा विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या तारापूर औद्योगिक क्षेत्रातील दोन रासायनिक कारखान्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने उत्पादन बंदीची कारवाई केली आहे.

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सगित्ता प्रायव्हेट लिमिटेड आणि हिमसन केमिकल इंडस्ट्रीज या दोन रासायनिक कारखान्यांना औद्योगिक सांडपाण्याची बेकायदा विल्हेवाटी लावल्याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून उत्पादन बंदीची कारवाई करण्यात आली आहे.

भूखंड क्रमांक एन. तीन आणि चार वरील सगीत्ता प्रा. ली. या कारखान्याची तारापूर येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ च्या अधिकाऱ्यांनी १२ फेब्रुवारी रोजी अचानक तपासणी केली होती. अधिकाऱ्यांना स्थळ पाहणी दरम्यान  औद्योगिक सांडपाणी विना प्रक्रिया बेकायदेशीरपणे थेट कारखाना आवारात विल्हेवाट लावत असल्याचे आढळून आले होते. याप्रकरणी अधिकाऱ्यांनी सांडपाण्याचे नमुने ताब्यात घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले होते. प्रयोगशाळेच्या अहवालात आम्लयुक्त रासायनीक सांडपाणी असल्याचे अहवाल दिला होता.

त्यानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपनी व्यवस्थापनाला आपले म्हणणे सादर करण्यासाठी प्रथम कारणे दाखवा नोटीस व त्यानंतर अंतरिम नोटीस बजावून सुनावणी घेतली होती. सुनावणी मध्ये कंपनी व्यवस्थापनला कंपनी आवारात रासायनिक सांडपाण्यांचे उघड्यावर सुरू असलेल्या विल्हेवाटी बाबत समाधानकारक म्हणणे मांडता न आल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने रासायनिक सांडपाण्याची बेकायदेशीर विल्हेवाट लावून जल प्रदूषणास कारणीभूत आणि  पर्यावरणाचे नुकसान केले प्रकरणी जबाबदार धरत उत्पादन बंदीची कारवाई करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्रमांक एन- ७५ वरील हिमसन केमिकल इंडस्ट्रीज या कारखान्याचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अनेक वर्षापासून बंद अवस्थेत असून कारखान्यातील औद्योगिक सांडपाण्याची कारखान्याबाहेरील गटारामध्ये बेकायदा विल्हेवाट लावीत असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पाहणीत आढळून आल्याप्रकरणी उत्पादन बंदीची कारवाई करण्यात आली आहे.  एमआयडीसी आणि  महावितरणला या दोन्ही कारखान्यांचे पाणी आणि वीज पुरवठा खंडित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तारापूर औद्योगिक क्षेत्र आणि परिसरात औद्योगिक सांडपाण्याची बेकायदा विल्हेवाट लावण्याचे प्रकार  सुरूच आहेत. खैरापाडा येथील घरगुती सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारामध्ये  रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेत टँकर मधून आम्लयुक्त रसायनाची बेकायदा विल्हेवाट लावण्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. गटारात टाकलेल्या आम्लयुक्त रसायनामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी  पसरल्याने रहिवाशांना त्रास सहन करावा लागला. तारापूर औद्योगिक परिसरातील नाले, ओहोळ, खाडी, निर्जन जागेत औद्योगिक सांडपाण्याची बेकायदेशीर विल्हेवाट वाट लावणाऱ्यांचा शोध घेऊन  कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी  जाखड यांनी मागील आठवड्यात घेतलेल्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानंतर देखील अज्ञात कारखान्यांकडून औद्योगिक सांडपाण्याची बेकायदा विल्हेवाट लावण्याचे प्रकार सुरूच आहे.

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील जल आणि वायू प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई सुरू आहे. सगित्ता प्रा. ली. आणि हिमसन केमिकल इंडस्ट्रीज या उद्योगाकडून औद्योगिक सांडपाण्याची बेकायदा विल्हेवाट लावताना आढळून आल्याने त्यांच्यावर उत्पादन बंदीची कारवाई करण्यात आली आहे.– राजू वसावे, उप प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तारापूर १