पालघर : जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या अमृत सरोवर योजनेअंतर्गत १९ तलावांचे सुशोभीकरण पूर्ण झाले असून त्याकरिता नरेगांमधून सुमारे सव्वा कोटी रुपये व सामाजिक दायित्व फंडाचा वापर करण्यात आला होता. यामुळे गाव पातळीवर भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवणे, नागरिकांसाठी उपयुक्त पाण्याचा साठा वाढवणे तसेच गावाच्या सुशोभीकरणामध्ये हातभार लागला आहे.
अमृत सरोवर योजनेमध्ये निवडलेल्या तलावाचे खोलीकरण करणे (गाळ काढणे), परिसरात सुशोभीकरण अंतर्गत वृक्ष लागवड करणे, बसण्यासाठी बाक किंवा तत्सम व्यवस्था करणे, चालण्यासाठी पादचारी मार्ग तयार करणे, अमृत सरोवर बळकटीकरणासाठी तलावाच्या भागाला दगडी आधार (पिचिंग) करणे यांचा प्रामुख्याने समावेश यामध्ये होता.
हेही वाचा : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांची अवस्था दयनीय
या योजनेमध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कामांतर्गत आठ तलाव तसेच मनरेगा व सामाजिक संस्थांच्या आधाराने ८७ असे एकूण ९५ तलावांचा समावेश करण्याचे विचाराधीन होते. वेगवेगळ्या तांत्रिक अडचणी व मर्यादा पाहता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अमृत सरोवर योजनेत सहा तलावांचे काम पूर्ण केले असून मनरेगा तसेच टाटा मोटर्सच्या सामाजिक जाळीत व फंड मधून ७३ असे एकंदर ७९ तलावांचे खोली वाढवणे व गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले आहे. सद्यस्थितीत पाच तलावांचे काम प्रगतीपथावर असून ११ तलावांच्या ठिकाणी वेगवेगळ्या कारणांमुळे कामाला अजूनही आरंभ झाला नसल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आली.
हेही वाचा : दापचारी तपासणी नाक्यावर वाहतूक कोंडी
अमृत सरोवर योजनेअंतर्गत जव्हार तालुक्यात सर्वाधिक १७ तलाव यांचे योजनेअंतर्गत काम पूर्ण झाले असून वाडा तालुक्यात १५, पालघर तालुक्यात १३, डहाणू तालुक्यात नऊ, मोखाडा व विक्रमगड तालुक्यात प्रत्येकी आठ तर वसई तालुक्यात एका ठिकाणी तलावामध्ये वेगवेगळे सकारात्मक बदल घडल्याची माहिती जिल्हा परिषदेचे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे अतुल पारस्कर यांनी दिली आहे.