रमेश पाटील
वाडा : तालुक्यातील महत्वाचा समजला जाणारा शिरीषपाडा-खानिवली हा अवघा सहा किलोमीटरचा रस्ता येथील ठेकेदारांसाठी उत्पन्नाचे साधन ठरला आहे. या रस्त्यावर गेल्या १० वर्षांत १५ कोटी रुपये खर्च करूनही या रस्त्याची इतकी दुरवस्था झाली आहे की, या रस्त्यावरून दुचाकी चालविणेही मुश्कील झाले आहे.
गेल्या १० वर्षांपासून या रस्त्यावर दरवर्षी दुरुस्तीच्या नावाने लाखो रुपये खर्च केला जात आहेत. सर्वप्रथम हा रस्ता जिल्हा परिषदेच्या ताब्यात होता. जिल्हा परिषदेने सात वर्षांपूर्वी या रस्त्यावर अडीच कोटी रुपये खर्च करून डांबरीकरण केले होते. या डांबरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट झाल्याने त्या वेळी पहिल्याच पावसात हा रस्ता उखडून गेला.
रस्त्यावर अधिक खर्च येत असल्याने हा रस्ता जिल्हा परिषदेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांस्तरित केला. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे पुन्हा डांबरीकरणासाठी साडेतीन कोटी रुपयांचा खर्च केला. मात्र हे डांबरीकरणही अवघे दोन पावसाळे टिकले. या रस्त्याच्या साईटपट्टीसाठी एक कोटीहून अधिक खर्च करण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी या रस्त्यावर दुरुस्तीसाठी व या रस्त्यावरील लहान पूल बांधण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर खर्च करण्यात आला आहे. तरीसुद्धा रस्त्याची दुरवस्था कायम आहे.
रस्त्याच्या दुरुस्तीच्या नावाने दरवर्षी ठेकेदारांना लाखो रुपयांचा ठेका मिळावा म्हणून येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने या रस्त्याचे दरवर्षी निकृष्ट काम केले जाते, असा आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून केला जात आहे.
रस्त्याच्या दुतर्फा अनेक कारखाने आहेत, या कारखान्यांत येणाऱ्या अवजड वाहनांमुळे रस्ता उखडला जातो. हा रस्ता सिमेंट काँक्रीटीकरणाचा होणे गरजेचे असताना यासाठी येथील लोकप्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी लक्ष द्यायला तयार नाहीत. ठेकेदारांना दरवर्षी दुरुस्तीचा ठेका मिळावा यासाठीच या रस्त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना केली जात नसल्याचे बोलले जात आहे.
शिरीषपाडा-खानिवली रस्त्यावर दरवर्षी तात्पुरती मलमपट्टीसाठी लाखो रुपये खर्च केले जातात. तो खर्च करण्यापेक्षा एकदाच सिमेंट-काँक्रीटचा रस्ता तयार करावा.
– अमित मोकाशी, स्थानिक ग्रामस्थ
शिरीषपाडा-खानिवली या संपूर्ण रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. त्यासाठी निधी उपलब्ध होताच निविदा प्रक्रिया सुरू होईल.
– अनिल भरसड, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग वाडा.