पालघर : मनोर रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झाल्यानंतर हे या रस्त्यावरील वळण घाट परिसरामध्ये रस्त्यांच्या बाजूला असलेली साइडपट्टी अजूनही तयार केली नसल्यामुळे या परिसरात अपघातांचा मोठा धोका निर्माण झाला आहे या बाबीकडे महामार्ग प्राधिकरणही दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे.
महामार्गावरील वाघोबा खिंड परिसर अतिधोकादायक परिसर म्हणून ओळखला जातो. या परिसरात पूर्वी असलेल्या रस्ते इतकाच रस्ता अस्तित्वात आहे. पालघर हे जिल्हा मुख्यालय झाल्यामुळे हा रस्ता वाहनांनी गजबजलेला असतो. त्यामुळे रस्ता अरुंद पडू लागला आहे. कधी कधी या रस्त्यावर वाहतूक कोंडी मोठय़ा प्रमाणात होते. अलीकडेच काही दिवसांपूर्वी विटांनी भरलेला ट्रक वळण रस्त्यावर उलटला व त्यात दोघांचा मृत्यू झाला. अरुंद वळणामुळे एकमेकांसमोरची वाहने जाण्यासाठी एकच मार्गिका तीही अपुरी असल्यामुळे असे अपघात घडत असल्याचे सांगितले जाते.
घाट परिसरातील साइडपट्टी उखडली असून काही ठिकाणी सुमारे एक फूट खोल खड्डे तयार झाले आहेत. साइडपट्टी असली तरी ती ओबडधोबड व खोलगट असल्याने वाहनचालक गाडी खाली उतरवू शकत नाही. परिणामी, अरुंद रस्त्यावरून वाट काढत जावे लागते. काही ठिकाणचे रस्ते खड्डेमय झालेले आहेत. अगदी वळणावरच हे रस्ते खड्डेमय झाल्याने वाहनांना त्यातून मार्ग काढावा लागतो अशा वेळी एखादा अपघात घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे
पालघर जिल्ह्यातील व कामानिमित्त बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांना व तालुक्यातील पूर्व पट्टीत राहणाऱ्या नागरिकांना रस्तेमार्गाने पालघरला यायचे झाल्यास वाघोबा घाटातून यावे लागते. दुसरा जवळचा मार्गच उपलब्ध नसल्यामुळे रहदारीचा घाट म्हणून वाघोबा घाट ओळखला जातो. घाटात सुमारे शंभर मीटरपेक्षा जास्त अंतराची साइडपट्टी जोरदार पावसामुळे उखडून गेली होती. सात ते आठ महिने उलटूनही महामार्ग प्राधिकरणाकडून अद्याप कुठल्याही प्रकारची मलमपट्टी केलेली नाही. मात्र दुरवस्थेतील साइडपट्टीचे काम लवकरात लवकर करून घेण्यात येणार असल्याचे महामार्ग उपविभागीय कार्यालयाने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा