डहाणू : डहाणू शहरात सर्व मुख्य रस्त्यांवर मोठमोठाले खड्डे पडले आहेत. पावसाळय़ात त्यात पाणी साचल्याने हे रस्ते जणू तळीच बनून गेले आहेत. रस्त्यावरील डांबर, माती आणि दगडाने एकमेकांशी संबंध कधीच तोडलेला आहे त्यामुळे सलग रस्ता ही संकल्पनाच काल्पनिक वाटावी, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डहाणू रेल्वे स्थानकातून बाहेर पडणाऱ्या मुख्य प्रवेशद्वारावरच मोठे खड्डे पडले आहेत. रेल्वे स्थानक परिसरांत वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यातच डांबर आणि माती उखडलेल्या रस्त्यांमुळे परिस्थिती आणखी गंभीर बनत आहे. या खड्डय़ांतून वाट काढता काढता येथे चारचाकींची रांगच लागते. त्यामुळे वाहतूक कोंडी तर रोजचीच झाली आहे. डहाणू शहरातील तारपा चौक ते डहाणु स्टेशन, इराणी रोड, थर्मल पावर रोड, जकात नाका या  मुख्य रस्त्यावर मोठय़ा प्रमाणावर खड्डे पडले आहेत. येथून अनेक अवजड वाहनांचीही वाहतूक असते. रस्त्यातील खड्डय़ांमुळे वाहतूक अवघड झाली आहे. अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.

शहरात बारा महिने रस्ते खोदण्याचे काम सुरू असते. एकदा केलेल्या खोदकामानंतर ते रस्ते कधीही नीट बुजवले जात नाही. त्याचे योग्य ते पातळीकरण, सपाटीकरण वगैरे सोडाच. मात्र अशा कामाचा फटका पुढे पावसाळय़ात बसतो. जराशा पावसांतही रस्त्यावर खड्डे पडतात. डांबर, खडी बाहेर पडते. ग्रिट पावडरचा मुलामा देऊन केलेल्या निकृष्ट कामाचे पितळ उघडे पडते.

डहाणू येथे रेल्वे स्थानक, बस आगार, तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, पंचायत समिती, नगर परिषद, पोलिस स्टेशन, उपजिल्हा रुग्णालय, महत्त्वाच्या शाळा, महाविद्यालये आदी ठिकाणे आहेत. शेकडो नागरिक या कार्यालयांत तसेच आस्थापनांत कामानिमित्त भेटी देत असतात. त्यामुळे येथे वर्दळ प्रचंड असते. पावसाळय़ाच्या दिवसांत रस्त्यांची अवस्था इतकी वाईट असल्याने या सर्वच नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे.  

याबद्दल डहाणू नगर परिषदेकडे विचारणा केली असता, ‘थोडा पाऊस कमी झाल्यावर लगेचच खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात येईल, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीतील रस्त्यांची आणि खड्डय़ांची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खाते घेईल. त्यांच्यामार्फतसुद्धा खड्डे भरण्याचे काम हाती घेतले आहे.’ असे उत्तर देण्यात आले.

चिंचणी-डहाणू रस्त्याची चाळण

चिंचणी नाका ते डहाणू शहराला जोडणाऱ्या मुख्य मार्गाची खड्डय़ांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. या मार्गाच्या दुतर्फा गटारे नाहीत. सबब सध्या येथे पाणी साचून रस्त्याला तळय़ाचे स्वरूप आले आहे. शिवाय रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले आहेत. पाणी साचल्याने या खड्डय़ांचा अंदाज येत नाही आणि अपघात, दुर्घटना घडण्याच्या शक्यता वाढतात. चिंचणी नाका ते डहाणू मार्गावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडलेले आहेत. खड्डे चुकवताना अनेक अपघात होतात. चिंचणी-डहाणू या मुख्य रस्त्याजवळ ६ जिल्हा परिषद शाळा आहेत. या शाळांमधील विद्यार्थ्यांनाही खड्डय़ांमुळे येथून प्रवास करणे कठीण आणि धोकादायक झाले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने या रस्त्याचे काम तात्काळ हाती घ्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Potholes roads dahanu road rainy season accumulation water ysh