लोकसत्ता वार्ताहर

कासा : डहाणू, जव्हार आणि मोखाडा या तीन तालुक्यांमध्ये वारंवार होणाऱ्या वीज खंडितीमुळे अखेर महावितरणने मोठा निर्णय घेत, आज (सोमवार) सकाळी साडेनऊ वाजेपासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दुरुस्तीच्या कामांसाठी ३३ केवी वीज सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. विद्युत खांबांची दुरवस्था, लोंबकळणाऱ्या व तुटक्या तारांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे महावितरणकडून तातडीने देखभाल-दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर देखभाल अत्यावश्यक

दरवर्षी पावसाळ्यात वीज पुरवठा वारंवार खंडित होतो. झाडांच्या फांद्या तारांवर कोसळणे, ढगांचा कडकडाट, ओलावा यामुळे वायरिंगवर परिणाम होतो. त्यामुळे संभाव्य अपघात आणि गैरसोयी टाळण्यासाठी, यंदा पावसाळ्यापूर्वीच ही देखभाल आणि लाईन टाकण्याची कामे केली जात असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी विजेवर चालणारे पंप वापरले जातात. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने गावातील सार्वजनिक पाणी पुरवठा यंत्रणा ठप्प झाल्या आहेत. तसेच अनेक नागरिकांनी वयक्तिक कूपनलिका च्या माध्यमातून पाण्याची सोय केलेली असते. परंतू वीज खंडित झाल्याने पाणी मिळणे अवघड झाले होते. पाणी मिळत नसल्याने हवालदिल झालेले नागरिक हातपंप, विहिरी यावर पाणी शोधत फिरत आहेत.

डहाणूतील सुप्रसिद्ध महालक्ष्मी मातेच्या यात्रेला अवघ्या दोन दिवसांत सुरुवात होणार आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरात विद्युत पुरवठा सुरळीत राहावा म्हणून महावितरणने विद्युत लाईन टाकण्याचे काम सुरू केले आहे. या कामासाठी देखील वीज पुरवठा बंद ठेवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

व्यापाऱ्यांची व ग्रामस्थ महावितरणाने अचानक निर्णयामुळे आर्थिक फटका

एका बाजूला डहाणू व परिसरात ३८ ते ३९ अंश सेल्सिअस तापमानाची तगमग सुरु असताना, दुसऱ्या बाजूला अचानक घेतलेल्या वीज खंडित करण्याच्या निर्णयामुळे सामान्य नागरिकांसह व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

शाळा, शासकीय कार्यालये, हॉटेल्स, वेल्डिंग शॉप्स, शीतपेय विक्रेते, टायर दुकाने, चक्क्या आदी व्यवसायांना यामुळे मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. व्यापाऱ्यांनी यावर नाराजी व्यक्त करत महावितरणने पूर्वसूचना देणे गरजेचे असल्याचे मत मांडले आहे.

महावितरणचे वरिष्ठ अधिकारी यांनी नागरिकांना समजूतदारपणा दाखवण्याचे आवाहन केले आहे. “विजेच्या सुरळीत आणि सुरक्षित पुरवठ्यासाठी ही देखभाल अत्यावश्यक आहे. नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी या एकदिवसीय गैरसोयीसाठी सहकार्य करावे,” असे त्यांनी सांगितले.